West Indies vs Sri Lanka : कॅरेबियन वादळासमोर श्रीलंका पत्त्यासारखी कोसळली; विंडीजचा एक डाव आणि २१७ धावांनी दणदणीत विजय

आमीर-चेसची 'ती' ४०१ धावांची भागीदारी ठरली गेमचेंजर; श्रीलंकेचे गोलंदाज ठरले पूर्णपणे हतबल
WTC West Indies beat Sri Lanka
Published on
Updated on

सेंट जॉन्स : यजमान वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजने श्रीलंकेचा एक डाव आणि २१७ धावांच्या प्रचंड फरकाने पराभव केला आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतर्गत खेळवल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजने सर्वच आघाड्यांवर चमकदार कामगिरी केली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, रोस्टन चेसच्या नेतृत्वाखाली विंडिज संघाने मिळवलेला हा पहिलाच कसोटी विजय ठरला आहे.

या सामन्यात वेस्ट इंडीजचा कर्णधार रोस्टन चेसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेचा पहिला डाव ३०८ धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून कर्णधार धनंजय डिसिल्व्हाने सर्वाधिक १२० धावांची झुंजार खेळी केली, तर दिनेश चांदीमलने ५४ आणि सोनल दिनुशाने ४३ धावांचे योगदान दिले. मात्र, इतर कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. वेस्ट इंडीजकडून गोलंदाजीत जस्टिन ग्रीव्ह्सने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर केमार रोच, शमर जोसेफ आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेत श्रीलंकेला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

जंगू-चेसची ४०१ धावांची ऐतिहासिक भागीदारी

प्रत्युत्तरादाखल पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडीजची सुरुवात आश्वासक झाली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. परंतु, सामन्याचा नूर खऱ्या अर्थाने बदलला तो सहाव्या विकेटसाठी झालेल्या ऐतिहासिक भागीदारीमुळे. आमीर जंगू आणि कर्णधार रोस्टन चेस यांनी सहाव्या विकेटसाठी तब्बल ४०१ धावांची विशाल भागीदारी रचून श्रीलंकेच्या गोलंदाजांना हताश केले.

यादरम्यान आमीर जंगूने ३७२ चेंडूंचा सामना करत २३३ धावांचे शानदार द्विशतक झळकावले, तर कर्णधार रोस्टन चेसने ३२४ चेंडूंत १९४ धावांची उत्कृष्ट खेळी केली. या दोघांशिवाय कॅरेबियन संघाच्या इतर कोणत्याही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. वेस्ट इंडीजने आपला पहिला डाव ९ बाद ६२६ धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावाच्या आधारावर ३१८ धावांची भक्कम आघाडी घेतली. श्रीलंकेकडून मिलन प्रियनाथ रत्नायकेने ५ बळी घेतले, तर असिथा फर्नांडो आणि सोनल दिनुशा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावात श्रीलंकेचा अवघ्या १०१ धावांत खुर्दा

पहिल्या डावातील ३१८ धावांची पिछाडी भरून काढण्याच्या आणि डावाने होणारा पराभव टाळण्याच्या उद्देशाने श्रीलंका संघ दुसऱ्या डावात मैदानात उतरला. मात्र, कॅरेबियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. अवघ्या ८ धावांवर श्रीलंकेला पहिला धक्का बसला आणि त्यानंतर ठरावीक अंतराने विकेट्स पडत गेल्या.

दुसऱ्या डावात श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या १०१ धावांवर तंबूत परतला. दिनेश चांदीमलने सर्वाधिक ४३ आणि सोनल दिनुशाने १२ धावा केल्या; या दोघांशिवाय इतर एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही. वेस्ट इंडीजकडून दुसऱ्या डावात केमार रोचने ४, जेडन सील्सने ३ आणि शमर जोसेफने २ बळी घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना ३ जुलैपासून खेळवला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news