

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजने न्यूझीलंडचा १३ धावांनी पराभव करून टी २० विश्वचषक २०२४ स्पर्धेच्या सुपर-८ फेरीतील स्थान अगदी थाटात निश्चित केले. किवी संघाची वाट मात्र खडतर आहे. वेस्ट इंडिजचा न्यूझीलंडविरूद्ध टी २० विश्वचषकातील हा सलग दुसरा विजय आहे. दोन्ही संघात केवळ एक सामना २०१२ च्या विश्वचषकात खेळला होता, जो वेस्ट इंडिजने सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता.
टी २० विश्वचषक २०२४ च्या २६ व्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने न्यूझीलंडचा १३ धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ९ गडी गमावून १४९ धावा केल्या. शेरफेन रदरफोर्डने ३९ चेंडूत नाबाद ६८ धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १३६ धावा करू शकला. या विजयासह वेस्ट इंडिजचा संघ सुपर-८ मध्ये पोहोचला आहे.
न्यूझीलंडचा संघ सुपर-८ च्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. त्यांना १४ जूनला युगांडा आणि १७ जूनला पापुआ न्यू गिनीशी सामना करायचा आहे. या दोन सामन्यातील विजयही न्यूझीलंडच्या संघासाठी पुरेसा ठरणार नाही. वेस्ट इंडिजचे तीन सामन्यांत तीन विजयांसह सहा गुण आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानने आतापर्यंत दोनपैकी दोन्ही जिंकले आहेत. त्यांचे चार गुण आहेत. अफगाणिस्तानचा १४ जूनला पापुआ न्यू गिनीशी सामना होणार आहे. हा सामना जिंकल्यास किंवा पावसामुळे सामना रद्द झाल्यास अफगाणिस्तान संघ पात्र ठरेल. अफगाणिस्तान पापुआ न्यू गिनीकडून मोठ्या फरकाने पराभूत झाला तरच न्यूझीलंडला संधी मिळेल. तथापि, हे घडणे जवळजवळ अशक्य आहे. अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात युगांडाचा १२५ धावांनी पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात किवीजचा ८४ धावांनी पराभव केला होता. अशा स्थितीत अफगाणिस्तानही पात्र ठरणार हे निश्चित मानले जात आहे. अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीला पराभूत केल्यास त्यांचे सहा गुण होतील, तर न्यूझीलंडला दोन्ही सामने जिंकले तरी केवळ चार गुण मिळू शकतील. अशा स्थितीत किवी संघाची वाट खडतर आहे.
हेही वाचा :