

सेंट लुईस : माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद आणि गॅरी कास्पारोव्ह यांची एकेकाळची कट्टर बुद्धिबळ स्पर्धा 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या दोन दिग्गजांमध्ये ‘क्लच चेस: द लेजेंडस्’ या स्पर्धेत बुधवारी सामना होणार आहे. तीन दिवसांच्या या सामन्यात दररोज चार गेम खेळले जातील. यात 2 रॅपिड आणि 2 ब्लिट्झ गेम्सचा समावेश असेल.
सेंट लुईस चेस क्लबच्या अद्ययावत सेंटरमध्ये ही 12 डावांची चेस 960 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. यासाठी एकूण (1 लाख 44 हजार अमेरिकन डॉलर) इतकी बक्षिसाची रक्कम ठेवण्यात आली आहे. 1995 मध्ये न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या 107 व्या मजल्यावर ‘क्लासिकल वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये हे दोन खेळाडू आमने-सामने आले होते. आता हे दोन दिग्गज पुन्हा एकदा रॅपिड आणि ब्लिट्झ या प्रसिद्ध प्रकारात लढणार आहेत.
कास्पारोव्हने 2004 मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर केवळ प्रदर्शनी किंवा ब्लिट्झ स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे, तर आनंदने सेमी रिटायरमेंट घेतली असून, तो अधूनमधून छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये खेळतो. कास्पारोव्ह जगभर प्रशिक्षण कार्यक्रम चालवतो, तर आनंदने स्वतःला तरुण भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करण्यापुरते मर्यादित ठेवले आहे. डब्ल्यूएसीए या संस्थेच्या स्थापनेमागे त्याची प्रेरणा असून, याच संस्थेने डी. गुकेशच्या रूपात भारताला एक विश्वविजेता दिला आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.