Virat Kohli : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी साधला जय शहा यांच्यावर निशाणा

Virat Kohli : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी साधला जय शहा यांच्यावर निशाणा
Published on
Updated on

मुंबई ; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड केली. टी-20 पाठोपाठ वन-डे संघाचे कर्णधारपदही विराटकडून (Virat Kohli) काढून घेण्यात आले. बीसीसीआयच्या या कृतीवर निरनिराळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याला राजकीय संदर्भ जोडला असून, त्यांनी या प्रकरणी जय शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर विराटने मोहम्मद शमीची पाठराखण केली म्हणून शहजादे ऊर्फ जय शाह यांनी त्याची 'विकेट' घेतल्याचा आरोप केला आहे.

आधी कर्णधारपद काढले; मग कौतुक केले!

भारतीय क्रिकेटसाठी गेल्या 24 तासांचा काळ नाट्यमय घडामोडींचा ठरला. जवळपास पाच वर्षे कर्णधारपद सांभाळणार्‍या विराट कोहलीची इच्छा नसतानाही एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून त्याची हकालपट्टी करण्यात आली. याची कारणमीमांसाही न करण्यात आल्याने चाहत्यांनी दिवसभर 'बीसीसीआय'वर ताशेरे ओढले. (Virat Kohli)

कोहलीप्रेमींचा वाढता रोष पाहून 'बीसीसीआय'ने सायंकाळी भूमिकेचे स्पष्टीकरण दिले आणि त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची प्रशंसा केली. अध्यक्ष सौरभ गांगुलीने मर्यादित षटकांसाठी दोन कर्णधार नकोत, हे निवड समितीचे धोरण असल्याचे मांडले. मात्र, या सर्व घटनांमुळे भारतीय संघात सगळे काही आलबेल नसल्याचे स्पष्टपणे जाणवले.

या सर्व प्रकारानंतर आता असे अचानकपणे विराट कोहलीचे कर्णधारपद का काढून घेण्यात आले? यावर चर्चा सुरू झाली आहे. त्याची अनेक कारणे क्रिकेट चाहते आणि विराटचे फॅन देत असले, तरी नितीन राऊत यांना मात्र यामध्ये राजकीय पार्श्वभूमी असल्याचा संशय येत आहे. पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर ज्या खंबीरपणे विराट कोहली मोहम्मद शमीच्या पाठिशी उभा राहिला होता, तेव्हाच अंदाज यायला हवा होता की त्याचे कर्णधारपद जाणार. क्रिकेट नियामक मंडळात सध्या 'शाहजादे' राज्य करतायत ना! असा दावा नितीन राऊत यांनी ट्विटमध्ये केला आहे.

शमीच्या बाजूने उभा राहिला होता विराट! (Virat Kohli)

टी-20 वर्ल्डकपमध्ये सलामीच्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यावरून भारतीय संघावर टीका तर होत होतीच. मात्र, त्यासोबतच सामन्यात खराब कामगिरी करणार्‍या क्रिकेटपटू मोहम्मद शमीलादेखील त्याच्या धर्मावरून 'ट्रोल' केले जात होते, यावेळी विराट कोहली शमीच्या बाजूने उभा राहिला होता. 'कुणावरही धर्माच्या आधारावर निशाणा साधणे चुकीचे आहे. काहीजण सोशल मीडियावर आपली ओळख लपवून या पद्धतीची कृत्ये करतात. आता हे सर्व रोजचेच झाले आहे. हा जीवनातील सर्वात खालचा स्तर असून, अशा पद्धतीने त्रास दिला जातो. जर कुणाला मोहम्मद शमीचे खेळातील योगदान दिसत नसेल, तर मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही,' असे विराटने म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news