

Michael Clerk on Virat Kohli's test retirement
नवी दिल्ली/लंडन : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती अऩेकांना रूचलेली नाही. इंग्लंड दौऱ्याआधी अनपेक्षितपणे कोहलीने टेस्ट क्रिकेटला अलविदा केला. पण, त्याच्यावर संघ व्यवस्थापनाचा दबाव होता किंवा काय याबाबत मतमतांतरे व्यक्त होत आहेत. त्यामुळेच चाहत्यांमधून नेहमीच विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून चांगला निरोप मिळावा, अशी भावना व्यक्त झाली आहे.
त्यानंतर आता एका माजी क्रिकेटपटूने केलेल्या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वातील सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. किंग कोहलीच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. या क्रिकेटपटूने कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधील पुनरागमनाविषयी गौप्यस्फोट केला आहे. तो माजी क्रिकेटपटू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा जगप्रसिद्ध माजी कर्णधार मायकेल क्लार्क.
मायकल क्लार्क म्हणाला की, विराट कोहलीने नुकतेच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली, तरी भारत जर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत सपशेल अपयशी ठरला, तर कोहली पुन्हा संघात पुनरागमन करू शकतो.
मायकलने ‘Beyond23 Cricket’ पॉडकास्टमध्ये बोलताना म्हटले की, "जर भारत इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत 5-0 ने पराभूत झाला, तर चाहते विराट कोहलीला पुन्हा संघात खेळताना पाहू इच्छतील. आणि जर नवा कर्णधार शुभमन गिल, निवड समिती आणि चाहत्यांना त्याला गळ घातली तर विराट कोहली नक्कीच विचार करेल. तो अजूनही टेस्ट क्रिकेटवर प्रेम करतो आणि हे त्याच्या शब्दांतून स्पष्ट जाणवतं."
मायकेल क्लार्क म्हणाला की, "विराट अजूनही चांगलं क्रिकेट खेळतोय. निवृत्ती घेण्यामागे त्याचे वैयक्तिक कारण असतील, पण मला वाटतं की जर भारताला इंग्लंडमध्ये लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला, तर त्याचा निर्णय बदलू शकतो. माझं वैयक्तिक मत आहे की टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहलीसारखा 'चॅम्पियन' खेळाडू अजून हवा आहे. त्याची अनुपस्थिती भारतासाठीच नव्हे, तर टेस्ट क्रिकेटसाठीही मोठं नुकसान आहे."
दरम्यान, क्लार्क यांनी स्पष्ट केलं की, "माझं मत आहे की भारताचा सध्याचा संघ अजुनही इंग्लंडमध्ये जिंकू शकतो, अगदी कोहली आणि रोहितशिवायही. पण जर असं घडलं की इंग्लंडमध्ये भारत पूर्णपणे पराभूत झाला तर विराटवर पुन्हा संघात येण्याचा दबाव येऊ शकतो."
विराटने 2024 मध्ये टी20 क्रिकेटला अलविदा केला होता. त्यानंतर यंदा त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचे नेतृत्व युवा खेळाडू शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. तथापि, या भारतीय संघात रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमीसारख्या वरिष्ठ खेळाडूंची अनुपस्थिती भारतासाठी मोठी चिंतेची बाब ठरू शकते.
दरम्यान, इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरवात 20 जूनपासून होत आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली 14 जणांचा इंग्लंडचा संघ जाहीर झाला आहे. या मालिकेत भारताच्या संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीमुळे युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे.
पहिली कसोटी 20 जून 2025 रोजी लीड्समधील मैदानावर सुरू होईल. मालिका 4 ऑगस्ट 2025 रोजी लंडनमधील द ओव्हल मैदानावर संपेल.
कसोटी मालिकेतील सामन्यांचे वेळापत्रक
सामना तारीख स्थळ
20–24 जून लीड्स
2–6 जुलै एड्जबॅस्टन, बर्मिंघम
10–14 जुलै लॉर्ड्स, लंडन
23–27 जुलै ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
31 जुलै – 4 ऑगस्ट द ओव्हल, लंडन