

Virat Kohli Bollywood Debut: आपल्या आक्रमक फलंदाजीसोबतच विराटने आपल्या फिटनेस आणि व्यक्तिमत्त्वामुळेही चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता मात्र विराट क्रिकेटनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला सुरुवात झाली ती माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्या एका वक्तव्यामुळे.
बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या एका मुलाखतीत राहुल द्रविड यांना त्यांच्या संघातील कोणता खेळाडू बॉलिवूडमध्ये सर्वात चांगला अभिनेता ठरू शकतो, असा प्रश्न विचारण्यात आला. या मुलाखती दरम्यान अभिनेता अभिषेक बच्चनही उपस्थित होता.
या प्रश्नावर राहुल द्रविड यांनी सुरुवातीला काही जुन्या क्रिकेटपटूंची उदाहरणं दिली. सुनील गावस्कर यांनी अभिनय करण्याचा प्रयत्न केला होता. सैयद किरमानी यांनीही चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर अजय जडेजानेही एका चित्रपटात भूमिका साकारली होती. मात्र, त्यापैकी कुणालाही अभिनयाच्या क्षेत्रात मोठं यश मिळालं नाही, असं द्रविड यांनी सांगितलं.
स्वतः बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत विचारलं असता द्रविड यांनी मजेशीर उत्तर दिलं. “मला माझी ताकद माहिती आहे. त्यामुळे मी स्वतःची फसवणूक करणार नाही,” असं ते हसत म्हणाले.
यानंतर राहुल द्रविड यांनी विराट कोहलीचं नाव घेतलं. विराट इतर लोकांची नक्कल करण्यात खूप चांगला आहे, असं त्यांनी सांगितलं.
द्रविड यांच्या मते, विराट जेव्हा भारतीय संघात नव्याने आला होता, तेव्हा तो संघातील वरिष्ठ खेळाडूंची हुबेहुब नक्कल करायचा. त्याची ही कला त्यावेळी खूपच चर्चेत होती. सध्या विराट फारशी नक्कल करत नसला, तरी त्याच्यात ही कला पूर्वीपासूनच असल्याचं द्रविड यांनी सांगितलं.
विराटने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर वावरण्याची त्याला चांगलीच सवय झाली आहे. याच कारणामुळे अभिनयाच्या बाबतीत विराटमध्ये क्षमता असल्याचं द्रविड यांनी सूचित केलं.
मुलाखतीदरम्यान अनुष्का शर्माचाही उल्लेख झाला. विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यानंतर दोघांनीही आपल्या क्षेत्रात मोठं यश मिळवलं.
अनुष्का स्वतः एक यशस्वी अभिनेत्री असल्याने विराटला अभिनयाचे काही धडे ती नक्कीच देऊ शकते, असं मुलाखतीत मजेशीरपणे म्हटलं गेलं. विराट आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये दिसला आहे. त्यामुळे अभिनयाचा अनुभव त्याच्याकडे नक्कीच आहे.
याआधी प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनीही विराट कोहलीच्या अभिनय क्षमतेबाबत भाष्य केलं होतं. विराट आधीपासूनच चांगला अभिनेता आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.
विराटने दिल्लीतील वातावरणात वाढताना अनेक प्रकारचे अनुभव घेतले आहेत. त्याने आयुष्यात मिळालेलं यशही अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे. क्रिकेटसोबतच फिटनेस, लूक, स्पर्धा आणि मानसिक ताकद या सर्व बाबतीत त्याने स्वतःला टिकवून ठेवलं आहे, असं छाबरा यांनी सांगितलं होतं.
राहुल द्रविड आणि मुकेश छाबरा यांच्या वक्तव्यांमुळे विराटच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा रंगली आहे. मात्र, विराटने स्वतः अद्याप चित्रपटात काम करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
त्यामुळे विराट खरंच क्रिकेटनंतर अभिनयाच्या क्षेत्रात उतरणार का, याचं उत्तर सध्या फक्त विराटच देऊ शकतो. पण जर विराटने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली, तर त्याची ही नवी इनिंगही क्रिकेटच्या मैदानासारखीच धमाकेदार ठरेल, यात शंका नाही.