पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो केवळ एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. पुण्याची खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकी गोलंदाजांना खूप मदत करत आहे, त्यामुळे फलंदाजांना येथे खेळणे सोपे नाही. बेंगळुरू कसोटीत टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात 70 धावा करणाऱ्या कोहलीला पुणे कसोटीत कमाल दाखवण्यात यश आले नाही. गेल्या काही वर्षांत डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध कोहलीची भांबेरी उडत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
विराट कोहलीने 2012 ते 2020 या कालावधीत घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांच्या 36 डावांमध्ये डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध 619 धावा केल्या. यादरम्यान तो केवळ 5 वेळा बाद झाला. या कालावधीत कोहलीची फलंदाजीची सरासरी 123.8 राहिली. 2021 पासून, घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध 21 डावांमध्ये कोहलीची सरासरी 28.78 आहे. ज्यामध्ये त्याने 9 वेळा विकेट गमावली आहे. 2021 पासून घरच्या मैदानावर फिरकी गोलंदाजांविरुद्ध कोहलीचे रेकॉर्ड खूपच खराब राहिले आहे. कोहलीची आकडेवारी पाहता हे स्पष्टपणे समजू शकते की फिरकीपटूंचा सामना करणे त्याच्यासाठी खूप कठीण झाले आहे.
विराट कोहलीने 2012 ते 2021 या काळात मायदेशात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांच्या 54 डावांमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध 74.64 च्या सरासरीने 1866 धावा केल्या होत्या. या काळात 25 वेळा त्याची विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतली. 2021 पासून आतापर्यंत, कोहलीने घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या 22 कसोटी सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध केवळ 573 धावा केल्या आहेत. यादरम्यान तो फिरकी गोलंदाजांविरुद्ध 19 वेळा बाद झाला. यावेळी त्याची सरासरी केवळ 30.2 राहिली आहे.