पुढारी ऑनलाईन डेस्क : Joe Root vs Virat Kohli : पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीत इंग्लंडच्या जो रूटने शतक झळकावले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 35 वे शतक ठरले आहे. या शतकासह रूटने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. तो इंग्लंडचा कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याच बरोबर तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला आहे. रुटचा कसोटीतील उत्कृष्ट फॉर्म असाच कायम राहिला तर तो लवकरच सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडीत काढेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
रूटने 2024 मध्ये आठ महिन्यांत पाच कसोटी शतके झळकावली आहेत. फेब्रुवारीमध्ये रांचीमध्ये भारताविरुद्ध 122 धावांच्या नाबाद खेळीने हा प्रवास सुरू झाला. यानंतर त्याने जुलैमध्ये ट्रेंट ब्रिज येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 122 धावांची खेळी केली. त्यानंतर ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत दोन्ही डावात शतके झळकावली. पहिल्या डावात 143 तर दुस-या डावात 103 धावा केल्या. दुसरीकडे भारताचा स्टार फलंदाजा अशी ओळख असणा-या विराट कोहलीला त्याच्या मागील पाच कसोटी शतकांसाठी सहा वर्षे लागली आहेत. कोहलीने डिसेंबर 2018 मध्ये पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 123 धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 254 धावा केल्या. तर नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध 136 धावांची खेळी केली. त्यानंतर विराटाला पुढीची जवळपास साडेतीनवर्षे शतकी खेळी साकारता आली नाही. अखेर मार्च 2023 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अहमदाबाद कसोटीत 186 धावा करून शतकांचा दुष्काळ संपुष्टात आणला. त्यानंतर जुलै 2023 मध्ये क्वीन्स पार्क ओव्हलमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 121 धावा केल्या.
सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत जो रूट आता सहाव्या स्थानावर पोहचला आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 51 शतकांसह पहिल्या स्थानी आहे. तर जॅक कॅलिस 45 शतकांसह दुस-या स्थानी आहे. त्यानंतर रिकी पाँटिंग (41) तिस-या, कुमार संगकारा (38) चौथ्या आणि राहुल द्रविड (36) पाचव्या क्रमांकावर आहेत. रुटने 2024 मध्ये आतापर्यंत 5 शतके झळकावली आहेत. या वर्षी सर्वाधिक शतके करणारा तो खेळाडू आहे. त्याच्याबरोबर श्रीलंकेचा कमिंदू मेंडीस पाच शतके झळकावून संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहे.
51 शतके : सचिन तेंडुलकर (भारत)
45 शतके : जॅक कॅलिस (द. आफ्रिका)
41 शतके : रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)
38 शतके : कुमार संगकारा (श्रीलंका)
36 शतके : राहुल द्रविड (भारत)
35* शतके : जो रूट (इंग्लंड)
34 शतके : सुनील गावस्कर (भारत)
34 शतके : ब्रायन लारा (वेस्ट इंडिज)
34 शतके : महेला जयवर्धने (श्रीलंका)
34 शतके : युनिस खान (पाकिस्तान)
विदेशी मैदानांवर सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या इंग्लिश फलंदाजांमध्ये रुट हा ॲलिस्टर कुकनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडबाहेर त्याच्या नावावर 14 कसोटी शतके आहेत. या बाबतीत त्याने माजी क्रिकेटर केन बॅरिंग्टन यांची बरोबरी केली. कुकच्या नावावर विदेशी मैदानांवर 18 कसोटी शतके आहेत.
यावर्षी कसोटीत रुटने 12 सामन्यांच्या 21 डावांमध्ये 1143* धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 63.50 इतकी आहे. पाच शतकांव्यतिरिक्त त्याने चार अर्धशतके केली आहेत. या कॅलेंडर वर्षात श्रीलंकेच्या कमिंडू मेंडिसनेही पाच शतके झळकावली आहेत. त्याने सात कसोटी सामन्यांच्या 12 डावात 94.30 च्या सरासरीने 943 धावा केल्या आहेत. पाच शतकांव्यतिरिक्त मेंडिसच्या नावावर तीन अर्धशतकेही आहेत. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल यावर्षी कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आठ कसोटी सामन्यांच्या 15 डावात 66.35 च्या सरासरीने 929 धावा केल्या आहेत. या काळात त्याने दोन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत विराट कोहली खूप मागे आहे. कोहलीने यावर्षी तीन कसोटी सामन्यांच्या सहा डावात 31.40 च्या सरासरीने 157 धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचा किंवा अर्धशतकाचाही समावेश नाही.
रूटने 2013 ते 2020 पर्यंत कसोटीत 17 शतके झळकावली होती, तर 2021 ते 2024 पर्यंत त्याने 18 शतके झळकावली आहेत. हे वर्ष अजून संपलेले नाही. कसोटीमध्ये एका कॅलेंडर वर्षात पाच किंवा त्याहून अधिक शतके झळकावण्याचा पराक्रम रुटने तिसऱ्यांदा केला आहे. या बाबतीत त्याने जॅक कॅलिस आणि स्टीव्ह स्मिथची बरोबरी केली. एका कॅलेंडर वर्षात पाच किंवा त्याहून अधिक कसोटी शतके झळकावण्याचा विक्रम मॅथ्यू हेडन आणि रिकी पाँटिंग यांच्या नावावर आहे. या दोघांनी प्रत्येकी पाच वेळा अशी कामगिरी केली आहे. रूटने ऑस्ट्रेलिया वगळता जगाच्या कानाकोपऱ्यात कसोटी शतक झळकावले आहे, जिथे तो चार किंवा त्याहून अधिक कसोटी खेळला आहे. रूटने ऑस्ट्रेलियात 14 कसोटी सामने खेळले आहेत. पण त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही.