पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli reached Australia : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने आपल्या एका पावलाने सर्वांनाच चकित केले आहे. टीम इंडियाच्या आधीच तो ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाला पोहोचणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे.
रिपोर्ट्सनुसार कोहली रविवारी संध्याकाळीच ऑस्ट्रेलियाला पोहोचला होता. त्याचे विमान पर्थमध्ये उतरले आणि आता तो लवकरच 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेची तयारी सुरू करणार आहे. पहिला कसोटी सामना पर्थमध्येच खेळवला जाणार आहे.
टीम इंडिया दोन बॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना झाली असून त्यांच्या आधी विराट रवाना झाला होता. कोहली शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसला. तो पत्नी अनुष्का आणि दोन मुलांसोबत होता. अर्थात तो शनिवारीच ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता.
10 नोव्हेंबरला निघालेली टीम इंडियाची बॅच सोमवारी दुपारी ऑस्ट्रेलियाला पोहोचली, तर 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना झालेली भारतीय खेळाडूंची दुसरी बॅच तुकडी मंगळवारी पोहोचेल. टीम इंडियाचे पहिले सराव सत्र मंगळवारीच सुरू होणार आहे.
कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. गेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये त्याला फक्त एकच अर्धशतक करता आले आहे. याआधीच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला न्यूझीलंडकडून त्यांच्याच घरच्या मैदानावर 0-3 असा पराभव पत्करावा लागला. त्या मालिकेत कोहली धावा काढण्यात अपयशी ठरला. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली खेळी करून टीकाकारांना प्रत्युत्तर आणि टीम इंडियाला विजय मिळवून देणे हेच त्याचे ध्येय असेल.