IPL 2025 RCB Virat Kohli Instagram story message to Phil Salt |
नवी दिल्ली : विराट कोहलीने १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आयपीएल ट्रॉफी जिंकली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या थरारक अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून इतिहास रचला. या ऐतिहासिक सामन्यानंतर विराट कोहलीने इंग्लंडचा विकेटकीपर-फलंदाज आणि सलामी जोडीदार फिल सॉल्टसाठी एक मजेशीर इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.
कोहलीने इंस्टाग्रामवर सॉल्टला शुभेच्छा दिल्या. कोहलीने आयपीएल ट्रॉफी हातात घेतलेल्या सॉल्टसोबतच्या फोटोवर "शाब्बास पार्टनर. आता खऱ्या गोष्टींकडे परत जा आणि डायपर बदलण्यासाठी सज्ज हो," असे लिहून इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. पोस्टमध्ये सॉल्टला टॅग केले आहे. फिल सॉल्ट अलीकडेच वडील झाला आहे. २९ मे रोजी पहिला क्वालिफायर सामना जिंकल्यानंतर तो इंग्लडला पत्नीसोबत होता. अंतिम सामन्याच्या दिवशीच तो परत आला होता.
आयपीएलच्या या हंगामात आरसीबीसाठी कोहली-सॉल्टची भागीदारी आघाडीवर राहिली. फिल सॉल्टने या वर्षी आरसीबीच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. वरच्या क्रमांकावर त्याच्या स्फोटक सुरुवातीने अनेकदा संघाच्या प्रभावी कामगिरीचा पाया रचला. डावाची सुरुवात करताना या जोडीने ४७.४२ च्या सरासरीने एकत्रितपणे ६६४ धावा केल्या. सॉल्टने हंगामात ३८७ धावा केल्या, तर कोहलीने ६५७ धावा केल्या. इंग्लंड सध्या वेस्ट इंडिजचे यजमानपद भूषवत असल्याने, सॉल्ट आज (४ जून) बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजय सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही याबाबत माहिती नाही.
'आरसीबी'चा भक्कम आधारस्तंभ असलेल्या विराट कोहलीने या लढतीसाठी ए.बी. डिव्हिलियर्सला खास निमंत्रण दिले आणि डिव्हिलियर्सही आवर्जून उपस्थित राहिला. डिव्हिलियर्स कधी काळी 'आरसीबी'च्या फलंदाजीचा मुख्य कणा राहिला. त्यावेळी 'आरसीबी' ला जरूर जेतेपदाने हुलकावणी दिली होती. यंदा मात्र ती कसर भरून निघाली आणि भावुक विराट एबीडीला म्हणाला, हा जितका माझा विजय, तितकाच तुझाही विजय !
विराट कोहली... तो भारतीय क्रिकेटचा भक्कम आधारस्तंभ... तमाम क्रिकेटप्रेमींसाठी जणू गळ्यातील ताईत.... 'विराट बोले, दुनिया चाले', इतकी त्याची खेळावर हुकूमत....हवा तो खेळाडू निवडण्याची, नको तो वगळण्याची.... सारी त्याला मुभा.... सोबत दिमतीला एकापेक्षा एक सरस संघ सहकारी.... सारी बडदास्त हाता-पायाशी लोळण घेणारी.... इतके असूनही मागील कित्येक वर्षे 'आयपीएल'च्या जेतेपदाने त्याला सतत हुलकावणी दिलेली.... यंदा मात्र ३ जूनची सायंकाळ आली ती याच विराटसाठी विजयाचा कवडसा घेऊनच.... खरे तर या सायंकाळीदेखील विजयाच्या मार्गात असंख्य काटे आलेच.... पण यानंतरही जिंकला तो विराटचा दुर्दम्य निर्धार... जिंकली ती त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती... आणखी एक योगायोग पाहा.... त्याची जर्सी १८ क्रमांकाची आणि यंदा 'आयपीएल'चे वर्षही अठरावेच.... मग काय.... योग जुळून आला आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'आरसीबी'च्या स्वप्नवत विजयावर शिक्कामोर्तब झाले.... शेवटच्या षटकातील पहिले एक-दोन चेंडू टाकले गेले असतानाच विराटला 'विजयश्री'ची खात्री झाली होती.... तो भावुक होत आनंदाश्रूना वाट मोकळी करून देत होता.... तिकडे स्टेडियमच्या कानाकोपऱ्यात मात्र 'आरसीबी'चेच ब्रीद गुंजत होते..... 'ई सला कप नमदे!' याचा कन्नड भाषेतील अर्थ 'यंदा कप आमचाच !'