

आयपीएल 2025 च्या हंगामातील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे, या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी केली. अंतिम सामन्यात मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा असलेला विराट कोहली 35 चेंडूत 43 धावा काढल्यानंतर बाद झाला. या खेळीच्या जोरावर त्याने आयपीएलच्या इतिहासात एक मोठा विक्रम नोंदवला. यात त्याने शिखर धवनला मागे टाकले.
विराट कोहली आता आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात कोहलीने 43 धावांच्या खेळीदरम्यान एकूण तीन चौकार मारले. यासह, आयपीएलच्या इतिहासात कोहलीच्या नावावर आता एकूण 771 चौकारांची नोंद झाली आहे. कोहलीपूर्वी, नंबर-1 स्थानावर असलेल्या शिखर धवनने आयपीएलच्या इतिहासात एकूण 768 चौकार मारण्याचा विक्रम केला होता. विराट कोहलीने आयपीएल कारकिर्दीतील 267 व्या सामन्यात हा टप्पा गाठला आहे.
विराट कोहली : 771 चौकार
शिखर धवन : 768 चौकार
डेव्हिड वॉर्नर : 663 चौकार
रोहित शर्मा : 640 चौकार
अजिंक्य रहाणे : 514 चौकार
विराट कोहलीचा आयपीएलच्या इतिहासात एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध एकूण 1146 धावा करणाऱ्या कोहलीने आता हा आकडा ओलांडला आहे. त्याने पंजाब किंग्जविरुद्ध आयपीएलमध्ये एकूण 1159 धावा केल्या आहेत.