

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट तळपली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संस्मरणीय अशी 98 चेंडूत 5 चौकारांसह 84 धावांची खेळी केली. दुबईच्या मैदानावर कठीण परिस्थितीत सापडलेल्या भारतीय संघाचा डाव सावरला. त्याने श्रेयस अय्यर, अक्षर पटेलच्या साथीने महत्त्वपूर्ण भागिदारी रचल्या, ज्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला. यादरम्यान, कोहलीने आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज बनला आहे. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडीत काढला.
कोहलीने त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर एक अद्भुत विक्रम आपल्या नावावर केला. आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये 1000 धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा 808 धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय, रिकी पॉन्टिंग (731) या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
खरं तर, कोहली आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये सर्वाधिक वेळा 50+ धावांची खेळी करणारा खेळाडू बनला आहे. त्याने 53 डावांमध्ये 24 व्या वेळी 50+ धावा केल्या. सचिनने त्याच्या कारकिर्दीत आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये 58 डावांमध्ये 23 वेळा 50+ धावा केल्या. यादीत तिसऱ्या क्रमांकावर 'हिटमॅन' रोहित शर्मा आहे, ज्याने 42 डावांमध्ये 18 वेळा हा पराक्रम केला आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा (56 डावात 17 वेळा) चौथ्या आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (60 डावात 16 वेळा) पाचव्या स्थानावर आहे.
कोहलीने एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना 8 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही केला. हा आकडा गाठणारा तो दुसरा खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना 8720 धावा केल्या. भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 6115 धावा केल्या. श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या (5742) आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस (5575) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.