

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या 20व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)चा स्टार फलंदाज विराट कोहलीने मुंबई इंडियन्स (MI) विरुद्धच्या सामन्यात नवा विक्रम रचला आहे. कोहलीने आपल्या टी-20 क्रिकेट कारकिर्दीत 13,000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
वानखेडे स्टेडियमवरील मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने टॉस गमावला. मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिला फलंदाजी करण्यास आरसीबीचे सलामीवीर फिल साल्ट आणि विराट कोहली उतरले. साल्टने बोल्टला चौकार ठोकून संघाचे खाते उघडले. पण पुढच्याच चेंडूवर तो क्लिन बोल्ड झाला. पहिल्याच षटकात विकेट गमाल्याने आरसीबी बॅकफुटवर जाणार असे वाटत होते. पण पड्डीकलच्या साथीने विराटने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने फटकेबाजी सुरू केली. अरसीबीला त्याच्याकडून ज्या खेळीची अपेक्षा होती, ती अखेर या सामन्यात पाहायला मिळाली. त्याने बघता बघता अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर एक शानदार षटकार देखील मारला.
कोहलीचं या हंगामातील दुसरं अर्धशतक आहे. यापूर्वी त्यांने आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध नाबाद 59 धावांची खेळी केली होती. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध तो 31 धावा करू शकला होता. तर गुजरात टायटन्स विरुद्ध तो फक्त 7 धावा करून बाद झाला. मात्र मुंबई इंडियन्स विरुद्ध कोहलीने पुन्हा फॉर्ममध्ये पुनरागमन करत गोलंदाजांची चांगली धुलाई केली. विघ्नेश पुथुरच्या चेंडूवर षटकार ठोकत त्यांने आपले अर्धशतक पूर्ण केले, ज्यासाठी त्यांने 29 चेंडूंचा सामना केला.
या सामन्यापूर्वी कोहलीने टी-20 मध्ये 12983 धावा केल्या होत्या, परंतु मुंबईविरुद्ध 17 धावा पूर्ण करताच तो 13000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला. कोहलीपूर्वी फक्त ख्रिस गेल, अॅलेक्स हेल्स, शोएब मलिक आणि किरॉन पोलार्ड यांनीच टी-20 मध्ये 13000 धावा पूर्ण केल्या आहेत.
कोहलीने अॅलेक्स हेल्सला मागे टाकले आणि टी-20 मध्ये सर्वात जलद 13000 धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज बनला. कोहलीने 403 सामन्यांच्या 386 डावांमध्ये 13,000 टी-20 धावा पूर्ण केल्या. त्याच्या पुढे वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आहे. गेलने 389 सामन्यांपैकी 381 डावांमध्ये हा आकडा गाठला. हेल्सने 478 सामन्यांपैकी 474 डावांमध्ये या धावा केल्या होत्या.