पुढारी ऑनलाईन डेस्क : Vaibhav Suryavanshi | आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी सुरू असलेल्या महालिलावात रविवारी पहिल्या दिवशी फलंदाजांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली, तर लिलावाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी दुसऱ्या फळीतील वेगवान गोलंदाजांवर पैशाचा पाऊस पडला. यात १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी यंदाच्या आयपीएल लिलावात सहभागी होणारा सर्वात युवा खेळाडू आहे. त्याला १.१० कोटी रुपयांची बोली लागली.
आयपीएल लिलावात ३० लाख मूळ किंमत असलेल्या वैभवची दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरस होती. अखेरीस राजस्थानने बाजी मारली. त्यामुळे तो आयपीएलमध्ये बोली लागलेला सर्वात लहान खेळाडूही आहे. आता जर त्याला राजस्थानने प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली, तर त्याला पदार्पणाचीही संधी मिळेल. २७ मार्च २०११ मध्ये बिहारमधील समस्तीपूर येथे जन्मलेल्या वैभवने यापूर्वीच त्याच्या प्रतिभेची चुणूक दाखवलेली आहे. त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत जानेवारी २०२४ मध्ये बिहारसाठी पदार्पण केले. त्यावेळी त्याचे वय १२ वर्षे २८४ दिवस होते. त्यामुळे तो रणजीमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू होता. त्याची नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या युवा संघांच्या कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघात निवड झाली होती. त्यावेळी त्याने अवघ्या ६२ चेंडूंत १०४ धावांची खेळी केली होती. त्यावेळी तो १३ वर्षे १८८ दिवस इतक्या वयाचा होता. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेटमध्ये शतक करणारा तो सर्वात युवा खेळाडूही ठरलेला.