Vaibhav Suryavanshi Video: टाय- सूटमधील वैभवचा रॉयल अंदाज पाहून चाहते थक्क; म्हणाला, 'अभिषेक भाईने शेवटच्या क्षणी...'

Vaibhav Suryavanshi Wimbledon: विंबल्डन 2026 च्या अंतिम सामन्याला उपस्थित राहिलेल्या वैभव सूर्यवंशीच्या फॉर्मल लूकची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
Vaibhav Suryavanshi Wimbledon
Vaibhav Suryavanshi WimbledonPudhari
Published on
Updated on

Vaibhav Suryavanshi Wimbledon: भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या फलंदाजीमुळे नव्हे, तर विंबल्डन 2026 च्या अंतिम सामन्यातील त्याच्या खास लूकमुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. काळ्या रंगाचा सूट, टाय आणि रिमलेस गॉगल अशा आकर्षक पोशाखात तो सेंटर कोर्टवर दिसला. मात्र, या लूकमागे कोणतेही विशेष नियोजन नव्हते, असे त्याने स्वतः स्पष्ट केले.

यावेळी वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा आणि माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांच्यासोबत विंबल्डनच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित होता. जेनिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी आलेल्या वैभवचा फॉर्मल लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला.

सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत वैभवने आपल्या पोशाखाबद्दल सांगितले की, "मी कपड्यांसाठी काही विशेष तयारी केली नव्हती. शेवटच्या क्षणी जे उपलब्ध होतं ते अभिषेक भाईने अरेंज करून दिलं आणि तेच घालून मी आलो."

वैभव टेनिसचा चाहता

वैभवने सांगितले की, तो गेल्या चार-पाच वर्षांपासून टेनिसचे सामने नियमित पाहत आहे. लहानपणापासूनच त्याला या खेळाची आवड असून राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच हे त्याचे आवडते खेळाडू आहेत. तो म्हणाला, "मला अजूनही जोकोविचचा खेळ खूप आवडतो. मात्र सध्याच्या काळात कार्लोस अल्काराझने सर्वाधिक प्रभावित केलं आहे."

युवराज सिंगची भेट ठरली खास

या दौऱ्यात वैभवची त्याचा आदर्श मानल्या जाणाऱ्या युवराज सिंग याच्याशीही भेट झाली. त्याने सांगितले की, युवराजकडून अनेक महत्त्वाचे सल्ले आणि अनुभव ऐकायला मिळाले.

वैभव म्हणाला, "युवराज सिंग माझ्या आदर्शांपैकी एक आहेत. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासोबत बराच वेळ संवाद साधता आला आणि त्यांनी दिलेलं मार्गदर्शन माझ्यासाठी खूप मोलाचं आहे."

क्रिकेटसोबतच टेनिसचीही आवड

अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली असली, तरी टेनिसबद्दलही त्याला तितकीच आवड असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले. विंबल्डनसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेचा अनुभव आणि युवराज सिंगसारख्या दिग्गजाकडून मिळालेले मार्गदर्शन, त्याच्या पुढील प्रवासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news