

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी श्रीलंका दौऱ्यावरील एकदिवसीय तिरंगी मालिकेसाठी 'इंडिया-ए' संघाची घोषणा केली आहे. या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून, १५ वर्षीय डावखुरा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीची निवड हे या निवडीचे मुख्य आकर्षण ठरले आहे.
अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवून वैभवने क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. या महत्त्वाच्या मालिकेसाठी अष्टपैलू खेळाडू तिलक वर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आले असून, रियान पराग उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.
९ जूनपासून श्रीलंकेत या तिरंगी मालिकेचा थरार रंगणार आहे. यामध्ये यजमान श्रीलंका-ए, इंडिया-ए आणि अफगाणिस्तान-ए असे तीन संघ आमनेसामने असतील. ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली जाणार असून, गुणतालिकेत अव्वल स्थानी राहणाऱ्या दोन संघांमध्ये २१ जून रोजी अंतिम सामना रंगेल. स्पर्धेतील सर्व सामने डंबुला येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
आयपीएल २०२६ च्या हंगामात आपल्या फलंदाजीने छाप पाडणाऱ्या युवा खेळाडूंना बीसीसीआयने झुकते माप दिले आहे. पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह या सलामीवीरांना संघात स्थान मिळाले आहे. यासोबतच अंशुल कंबोज, यश ठाकूर, विपराज निगम, आयुष बडोनी आणि हर्ष दुबे यांसारख्या गुणवान खेळाडूंचा समावेश करून संघ संतुलित राखण्याचा प्रयत्न निवड समितीने केला आहे.
९ जून: भारत-ए विरुद्ध श्रीलंका-ए
११ जून: भारत-ए विरुद्ध अफगाणिस्तान-ए
१५ जून: भारत-ए विरुद्ध श्रीलंका-ए
१७ जून: भारत-ए विरुद्ध अफगाणिस्तान-ए
२१ जून: अंतिम सामना (दोन अव्वल संघांत)
तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंह (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), विपराज निगम, यश ठाकूर, युद्धवीर सिंह, अंशुल कंबोज, अर्शद खान.
एकदिवसीय तिरंगी मालिका संपल्यानंतर भारतीय संघाला यजमान श्रीलंकेविरुद्ध दोन बहुदिवसीय (रेड बॉल) सामनेदेखील खेळायचे आहेत. हे सामने गाले येथील मैदानावर होतील. या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआय लवकरच स्वतंत्रपणे करणार आहे. सध्या तरी सर्वांच्या नजरा १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर खिळल्या आहेत.