Vaibhav Sooryavanshi Captain : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे बिहारचे कर्णधारपद; सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत सांभाळणार धुरा

इंदूर येथे होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात १४ नोव्हेंबर रोजी बिहारची गाठ सौराष्ट्रशी पडणार
Vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshi
Published on: 
Updated on: 

पाटणा : भारताचा उदयोन्मुख युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्याकडे २०२६-२७ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बिहार संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनने (बीसीए) शुक्रवारी या प्रतिष्ठेच्या टी-२० स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली असून, अवघ्या १५ व्या वर्षी वैभव बिहारचे नेतृत्व करणार आहे.

इंदूर येथे होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात १४ नोव्हेंबर रोजी बिहारची गाठ सौराष्ट्रशी पडणार असून, १६ नोव्हेंबर रोजी रेल्वेविरुद्ध दुसरा सामना रंगणार आहे. या दोन्ही सामन्यांत वैभव संघाचे नेतृत्व करेल, तर सूरज कश्यपची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

वैभव सूर्यवंशीसाठी चालू वर्षातील ही पहिलीच नेतृत्व जबाबदारी नाही. याआधी २०२६-२७ च्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पूर्व विभागाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. त्यावेळी तो इशान किशनचा उपकर्णधार म्हणून कार्यरत होता. मध्य विभागाविरुद्धच्या उपांत्य फेरीत किशन मनगटाच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्यानंतर वैभवला संघाचे नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. चेन्नई येथे दक्षिण विभागाविरुद्ध झालेली अंतिम लढत अनिर्णित सुटली असली, तरी पहिल्या डावातील तब्बल ३७२ धावांच्या भक्कम आघाडीच्या जोरावर पूर्व विभागाने विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.

बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हर्षवर्धन यांनी या निवडीचे स्वागत करताना सांगितले की, ही जबाबदारी वैभवला एक क्रिकेटपटू आणि सक्षम कर्णधार म्हणून अधिक प्रगल्भ होण्याची संधी देईल. वैभवने इतक्या लहान वयातच अफाट प्रतिभा, आत्मविश्वास आणि परिपक्वतेचे दर्शन घडवले आहे. आगामी हंगामात बिहारचे प्रतिनिधित्व करताना वैभवच्या नेतृत्वाखाली संघ शिस्तबद्ध, स्पर्धात्मक आणि प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डावखुरा फलंदाज असलेल्या वैभवसाठी २०२६ हे वर्ष स्वप्नवत ठरले आहे. १९ वर्षांखालील गटात आपल्या कौशल्याची चुणूक दाखवल्यानंतर त्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये धडाकेबाज कामगिरी करत थेट भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळवले. २०२६ च्या १९ वर्षांखालील पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने साकारलेली १७५ धावांची वादळी खेळी आणि स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार विशेष लक्षवेधी ठरला. त्यानंतर आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने २३७.३० च्या अद्भूत स्ट्राईक रेटने तब्बल ७७६ धावा कुटत संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान पटकावला.

या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर त्याला भारताच्या टी-२० संघात पाचारण करण्यात आले. मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि भारताचा सर्वात तरुण पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरण्याचा बहुमान मिळवला. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात वैभवने अभिषेक शर्मासह पहिल्या सहा षटकांत बिनबाद ११८ धावांची ऐतिहासिक भागीदारी केली. आंतरराष्ट्रीय पुरुष टी-२० क्रिकेटच्या पॉवरप्लेमधील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

दरम्यान, अष्टपैलू खेळाडू मंगल महूर आणि वेगवान गोलंदाज साकिब हुसेन यांचा संघात समावेश त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल. पहिल्या दोन सामन्यांनंतर त्यांच्या तंदुरुस्तीचा आढावा घेऊन त्यांच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

बिहारच्या १७ सदस्यीय संघात वैभव सूर्यवंशी (कर्णधार) आणि सूरज कश्यप (उपकर्णधार) यांच्यासह आलोक कुमार, आयुष लोहारुका (यष्टीरक्षक), अल्तमश अशरफ, परम कुमार सिंग, अनमोल कुमार (यष्टीरक्षक), ऋत्विक राज, मयंक कुमार, राघवेंद्र प्रताप, आशिष कुमार, वासुदेव प्रताप सिंग, मोहम्मद इझहार, आमोद यादव, प्रशांत सिंग, नवाज खान आणि हिमांशू सिंग यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.