

गुवाहाटी : आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी जागतिक क्रिकेटमधील सर्वात घातक गोलंदाज समजल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या मनात धडकी भरवली. राजस्थानच्या वैभवने बुमराहविरुद्ध ज्या आक्रमकतेने फलंदाजी केली, त्याचे दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने तोंडभरून कौतुक केले आहे. स्टेनच्या मते, वैभवपुढे बुमराहसारख्या अनुभवी गोलंदाजही हतबल झाल्याचे पहायला मिळाले.
काल संध्याकाळी गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडताना दिसला. अवघ्या १५ वर्षांच्या या मुलाने बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून आपल्या इराद्यांची प्रचिती दिली. त्यानंतर अवघ्या दोन चेंडूंच्या अंतराने त्याने पुन्हा एकदा बुमराहला सीमापार धाडले. ही लढत जरी केवळ पाच चेंडूंची असली, तरी त्यात वैभवचे पारडे जड राहिले. डेल स्टेनच्या मते, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० वर्षांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या बुमराहला अशा प्रकारे आजवर क्वचितच कोणी हतबल केले असेल. या सामन्यात बुमराह पूर्णपणे दिशाहीन वाटत होता आणि सलग चौथ्या सामन्यात त्याला एकही बळी मिळवता आला नाही.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या 'टाईमआऊट' कार्यक्रमात बोलताना डेल स्टेनने या मानसिक द्वंद्वाचे सखोल विश्लेषण केले. स्टेन म्हणाला की, "वैभवने गोलंदाजांच्या मनात एक दहशत निर्माण केली आहे. बुमराहसारखा गोलंदाज जेव्हा त्याला चेंडू टाकत होता, तेव्हा त्याच्या मनात कुठेतरी ही भीती होती की आपली लाईन आणि लेन्थ अचूक असायला हवी. बुमराहसारख्या महान गोलंदाजाकडून 'हाफ-व्हॉली' पडणे ही दुर्मिळ गोष्ट आहे, पण जेव्हा फलंदाज तुमच्यावर इतका दबाव आणतो, तेव्हा तुमच्याकडून चुका होतातच. षटकार बसल्यानंतर बुमराहच्या चेहऱ्यावर जे हसू होते, ते हेच सुचवत होते की त्याला आपली चूक उमजली होती."
स्टेनने पुढे नमूद केले की, वैभव सूर्यवंशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची निर्भयता. गेल्या वर्षी त्याने शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा यांसारख्या भारतीय वेगवान गोलंदाजांची धुलाई केली होती आणि आता त्याच्या यादीत बुमराहचे नावही जोडले गेले आहे. सामन्याचा निकाल काहीही लागला असला, तरी वैभव आणि यशस्वी जैस्वाल यांनी ज्या पद्धतीने मुंबईच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले, त्याचीच चर्चा सध्या सर्वत्र आहे.
स्टेनच्या मते, वैभवसमोर गोलंदाजी करताना तुम्ही चेंडूचा टप्पा किंचितही चुकलात, तर तो तुम्हाला थेट मैदानाबाहेर टोलवणारच, याची खात्री असते. समोर बुमराह असो किंवा कोणताही सामान्य गोलंदाज, वैभव आपल्या नैसर्गिक आणि आक्रमक शैलीतच खेळतो. त्याचे हे 'बिंधास्त' असणेच त्याला इतर फलंदाजांपेक्षा वेगळे ठरवते आणि भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी ही एक आश्वासक चिन्हे आहेत.