

US Open 2025
भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या ब्रायन यांगचा थेट सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. ही त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे. या दमदार कामगिरीमुळे तो भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरुष एकेरी खेळाडू बनला आहे.
अमेरिकेच्या आयोवा राज्यातील काउन्सिल ब्लफ्स कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, २० वर्षीय आयुष शेट्टीने आक्रमक खेळ दाखवत २१-१८, २१-१३ अशा फरकाने सामना आपल्या नावे केला. ब्रायन यांगने सामना टिकून राहण्याचा प्रयत्न केला; पण आयुषच्या आक्रमक खेळीसमोर त्याचा टिकाव लागला नाही.
मंगळूरच्या २० वर्षीय आयुषसाठी २०२५ हे वर्ष कारकिर्दीला कलाटणी देणारे ठरले आहे. या हंगामाच्या सुरुवातीला शेट्टीने ऑर्लिन्स मास्टर्स सुपर ३०० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. या प्रवासात त्याने माजी विश्वविजेता लोह कीन येव आणि रासमस गेम्के यांचा पराभव केला. मे महिन्यात, त्याने वरिष्ठ सहकारी किदाम्बी श्रीकांतला हरवून तैपेई ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. आता BWF वर्ल्ड टूर विजेतेपदावर नाव कोरत त्याने इतिहास घडविला आहे.
आयुषने वयाच्या आठव्या वर्षी बॅडमिंटन खेळाला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने करकळा आणि मंगळूर येथे स्थानिक प्रशिक्षक सुभाष आणि चेतन यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. वयाच्या १२ व्या वर्षी, त्याला अधिक चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी त्याच्या कुटुंबाने बंगळूरला स्थलांतर केले. आईवडिलांनी नेहमीच त्याच्या खेळाला प्राधान्य दिले.
२०२३ मध्ये आयुषने अमेरिकेतील स्पोकेन येथे झालेल्या BWF जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. ही कामगिरी करणारा तो केवळ सहावा भारतीय पुरुष एकेरी खेळाडू ठरला होता. आक्रमक फटकेबाजी आणि उत्कृष्ट कोर्ट कव्हरेजसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयुषने आपल्या बचावात्मक खेळात सुधारणा करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. बंगळूर येथील प्रकाश पदुकोण अकादमीमधील प्रशिक्षणामुळे सर्वांगीण खेळात त्याची लक्षणीय प्रगती दिसून येत आहे. आयुष्य बंगळूरच्या रेवा विद्यापीठातून क्रीडा विज्ञानात पदवीचे शिक्षण घेत आहे. जून २०२५ पर्यंत, शेट्टी पुरुष एकेरीमध्ये जागतिक क्रमवारीत ३१ व्या स्थानी आहे. लक्ष्य सेननंतर तो दुसरा सर्वोच्च मानांकित भारतीय खेळाडू आहे.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या १६ वर्षीय तन्वी शर्माने उत्कृष्ट खेळ सादर केला, परंतु तिला अमेरिकेच्या अव्वल मानांकित बेवेन झांगकडून तीन गेमपर्यंत चाललेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. आपल्या पहिल्या वर्ल्ड टूर फायनलमध्ये गैरमानांकित तन्वीने पूर्ण ताकदीनिशी खेळ केला, पण ४६ मिनिटे चाललेल्या या सामन्यात तिला ११-२१, २१-१६, १०-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.