

पुढारी ऑनलाईन डेस्क : डबल ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिचे लग्न ठरले आहे. पीव्ही सिंधू २२ डिसेंबर रोजी उदयपूर येथे हैदराबाद येथील पोसीइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक वेंकट दत्त साई यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. सिंधूने नुकतेच रविवारी लखनौमध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यानंतर काही दिवसांत सिंधू लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तिचा लग्नसोहळा २० डिसेंबर रोजी सुरू होईल. तर २४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. "दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखत होती. पण एक महिन्यापूर्वीच सर्वकाही ठरवण्यात आले होते. सिंधू जानेवारीपासून विविध स्पर्धांमुळे व्यस्त राहणार आहे. यामुळे त्यापूर्वी डिसेंबरमध्ये लग्नसोहळ्याचे आयोजन शक्य होते," असे सिंधूचे वडील पीव्ही रामणा यांनी पीटीआय वृतसंस्थेशी बोलताना सांगितले.
पीव्ही सिंधूचे ज्यांच्याशी लग्न ठरले आहे; ते वेंकट दत्ता साई हे पोसीडेक्स टेक्नॉलॉजीजमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करतात. त्यांचे वडील जीटी व्यंकटेश्वर राव हे पोसीडेक्स टेक्नॉलॉजीजमध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर आहेत. त्यांनी यापूर्वी भारतीय महसूल सेवा (IRS) विभागात काम केले आहे.
वेंकट दत्ता साई यांनी फाउंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशनमधून लिबरल आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये डिप्लोमा केला आहे. त्यांनी २०१८ मध्ये फ्लेम युनिव्हर्सिटीमधून अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये बीबीए पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी बंगळूर येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये मास्टर्स केले. त्यांनी जेएसडब्लूमध्ये काम केले. डिसेंबर २०१९ मध्ये Posidex मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी सावर ॲपल ॲसेट मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.