Premier League : मँचेस्टर युनायटेडच्या विजयात व्हॅरेनचा निर्णायक गोल

Premier League : मँचेस्टर युनायटेडच्या विजयात व्हॅरेनचा निर्णायक गोल

मँचेस्टर, वृत्तसंस्था : डिफेंडर राफेल व्हॅरेनने अंतिम क्षणी गोलजाळ्याचा अचूक वेध घेतल्यानंतर मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग (Premier League) फुटबॉल स्पर्धेत व्हॉल्वरहॅम्प्टन वांडरर्सवर 1-0 असा निसटता विजय संपादन केला. उभय संघांतील ही लढत समन्वय व आक्रमक खेळाच्या अभावानेच अधिक गाजली.

व्हॅरेनने 76 व्या मिनिटाला हेडरवर गोलजाळ्याचा बिनचूक वेध घेतला आणि इथेच युनायटेड संघाचे 3 गुण वसूल झाले. रॉन व्हान बिसाकाच्या क्रॉस पासवर व्हॅरेनने किंचितही चूक न करत चेंडू गोलजाळ्यात धाडला. यजमान संघाचे हजारो चाहते आणि चिंतातूर मॅनेजर एरिक टेन हॅग यांच्यासाठी व्हरेनचा हा गोल विशेष दिलासा देणारा ठरला.

वास्तविक, व्हॉल्वरहॅम्प्टनचा संघ सध्या जणू अस्तित्वाचा लढा देत आहे. संघातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंचे अन्य क्लबकडे हस्तांतरण आणि स्पॅनिश मॅनेजर जुलेन लोपेतेगुईजची एक्झिट या संघाला खाईत लोटणारे ठरले. (Premier League)

त्यामुळे या लढतीत ते झगडत असताना याचा मँचेस्टर युनायटेडने पुरेपूर लाभ घेऊन सामन्यात एकतर्फी वर्चस्व गाजवणे अपेक्षित होते; पण प्रत्यक्षात येथे व्हॉल्वरहॅम्प्टनने गोल नोंदवण्याची एकापेक्षा एक संधी निर्माण करण्यावर भर दिला; तर दुसरीकडे मँचेस्टर युनायटेडचा संघ अनपेक्षितपणे झगडत राहिला. आता व्हॉल्वरहॅम्प्टनला संधी निर्माण करूनही त्याचे गोलमध्ये रूपांतर करता न आल्याने शेवटच्या टप्प्यात लढत पोहोचेपर्यंत गोलकोंडी कायम होती.

प्रीमियर लीग स्पर्धेतील या सलामी लढतीत अखेर व्हॅरेनने दुसर्‍या सत्रातील 76 व्या मिनिटाला ही गोलकोंडी फोडली आणि हेडरवर अप्रतिम गोल करत मँचेस्टर युनायटेडला 1-0 अशी हवीहवीशी आघाडी मिळवून दिली.

युनायटेडचा गोलरक्षक आंद्रे ओनानाने क्लबतर्फे आपले व्यावसायिक पदार्पण नोंदवताना व्हॉल्वरहॅम्प्टनची बरीच आक्रमणे सहजपणे थोपवली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news