

पुढारी ऑनलाईन डेस्क : U19 Women T20 World Cup : मलेशियातील क्वालालंपूर येथे होणाऱ्या ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचे नेतृत्व निक्की प्रसादकडे देण्यात आले आहे. तर सानिका चाळके हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारतासाठी अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या बहुतेक खेळाडूंना विश्वचषक मोहिमेसाठीच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
भारतीय महिला संघाने नुकतेच बांगलादेशचा पराभव करत अंडर-19 आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. ही मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर आता टीम इंडियाच्या युवा महिला खेळाडू जग जिंकण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गेल्या वर्षी शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्यावहिल्या अंडर-19 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यावेळी अंतिम सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 69 धावांचे लक्ष्य आरामात गाठून भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला होता.
2025 च्या अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात कमलिनी जी आणि भाविका अहिरे या दोन यष्टीरक्षकांना स्थान दिले आहे. तीन स्टँडबाय खेळाडूंसाठी नंदना एस, इरा जे आणि अनाडी टी यांची निवड झाली आहे. कमलिनीने अंडर-19 आशिया कप 2024 मध्ये भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली होती. तिने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून दिला होता. बांगलादेशविरुद्धच्या फायनलमध्ये 52 धावा करणाऱ्या जी त्रिशालाही स्थान मिळाले आहे.
19 वर्षाखालील महिला विश्वचषक 2025 मध्ये एकूण 16 संघ सहभागी होतील. त्यांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघ हा गतविजेता आहे आणि यजमान मलेशिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसह त्याला अ गटात ठेवण्यात आले आहे. भारत 19 जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर मलेशियाविरुद्ध (21 जानेवारी) आणि श्रीलंकेविरुद्ध (23 जानेवारी) सामने खेळले जाणार आहेत.
19 ते 23 जानेवारी दरम्यान ग्रुप स्टेजचे सामने खेळवले जातील. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ 25 ते 29 जानेवारी दरम्यान होणाऱ्या सुपर सिक्समध्ये प्रवेश करतील. सुपर सिक्समध्ये प्रत्येकी सहा संघांचे दोन गट असतील. सुपर सिक्समधील प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ 31 जानेवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील. अंतिम सामना 2 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.
भारतीय संघ : निक्की प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (यष्टीरक्षक), भाविका अहिरे (यष्टीरक्षक), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी धृती, आयुषी शुक्ला आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस.
स्टँडबाय खेळाडू : नंदना एस, इरा जे, अनादी टी.