

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठेच्या ओव्हल कसोटी सामन्यात मैदानातील खेळापेक्षा अंपायरच्या एका कृतीचीच जास्त चर्चा होत आहे. भारतीय संघ फलंदाजीसाठी संघर्ष करत असताना, मैदानावरील अंपायर कुमार धर्मसेना यांनी इंग्लंड संघाला मदत केल्याचा आरोप करत भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर संतापाची लाट उसळवली आहे. धर्मसेना यांच्या एका व्हायरल फोटोमुळे या नव्या वादाला तोंड फुटले आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्याच सत्रात भारतीय संघाची अवस्था बिकट केली. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल स्वस्तात परतल्यानंतर, साई सुदर्शन आणि शुबमन गिल डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते. पण शुबमन गिलही धावबाद झाल्याने भारताची चिंता वाढली. हा सर्व प्रकार भारतीय डावाच्या १३ व्या षटकात घडला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोश टंगचा एक धारदार इनस्विंगर चेंडू थेट साई सुदर्शनच्या पॅडवर आदळला. चेंडूचा वेग इतका होता की सुदर्शनचा तोल गेला आणि तो जमिनीवर कोसळला. गोलंदाजासह संपूर्ण इंग्लंड संघाने जोरदार अपील केली, पण अंपायर कुमार धर्मसेना यांनी सुदर्शनला नाबाद ठरवले.
धर्मसेना यांनी नाबादचा निर्णय दिल्यानंतरचा एक फोटो सोशल मीडियावर आगीसारखा पसरला. या फोटोमध्ये, चाहत्यांच्या मते, धर्मसेना इंग्लंडच्या खेळाडूंना हाताने इशारा करून सांगत आहेत की, चेंडू आधी बॅटला लागला होता. चाहत्यांचा आरोप आहे की, अंपायरने थेट इंग्लंडच्या खेळाडूंना माहिती देऊन त्यांचा एक महत्त्वाचा डीआरएस वाचवला. जर अंपायरने हा इशारा केला नसता, तर इंग्लंडने कदाचित रिव्ह्यू घेतला असता आणि तो वाया गेला असता. अंपायरने नकळतपणे का होईना, पण यजमान संघाला मदत केली, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे क्रिकेटच्या खिलाडूवृत्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एका महत्त्वाच्या सामन्यात अंपायरच्या अशा भूमिकेमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.