पुढारी ऑनलाईन डेस्क | UEFA Euro 2024 : फुटबाॅलचा थरार म्हणजे काय ?, हे पुन्हा एकदा आजपासून फुटबाॅल प्रेमींना अनुभवता येणार आहे. फिफा वर्ल्ड कपनंतर सर्वात प्रसिद्ध असलेली युरो कप स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. ही स्पर्धा १५ जून ते १५ जुलै दरम्यान खेळवली जाणार आहे. ग्रुप स्टेजचे सामने 26 जूनपर्यंत खेळवले जाणार आहेत. तर, तर बाद फेरीचे सामने 29 जूनपासून सुरू होणार आहेत. स्पर्धेचा किक ऑफ यजमान जर्मनी आणि स्कॉटलँन्ड यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना म्युनिक फुटबॉल एरिना येथे होणार आहे.
युरो कप 2024 स्पर्धेमध्ये एकूण 24 संघ सहभागी झाले आहेत. त्यांची प्रत्येकी चार संघांच्या सहा गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ राऊंड ऑफ 16 फेरीत पोहोचतील. याशिवाय, चार सर्वोत्कृष्ट तिसरे स्थान असलेले संघ 16 च्या फेरीसाठी पात्र ठरतील.
युरो कप 2024 च्या पहिल्या फेरीत संघ त्यांच्या गटातील इतर संघांसह प्रत्येकी एक सामना खेळतील. म्हणजेच प्रत्येक संघाला साखळी फेरीत तीन सामने खेळावे लागतील. यामध्ये आपल्या गटातील अव्वल दोन संघ राऊंड 16 फेरीसाठी पात्र ठरतील. राऊंड ऑफ 16 बाद फेरीची सुरुवात 29 जूनपासून होणार आहे. राऊंड ऑफ 16 च्या फेरीत म्हणजेच प्री-क्वार्टर फायनल जिंकणारे आठ संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. उपांत्यपूर्व फेरीतील विजयी संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल आणि उपांत्य फेरीतील विजयी संघ 15 जुलै रोजी बर्लिन येथील ऑलिम्पियास्टॅडियन येथे होणाऱ्या अंतिम फेरीत सहभागी होतील.
पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियाने रोनाल्डोवर यंदा चाहत्यांची खास नजर असणार आहे. वयाच्या 39 व्या वर्षी रोनाल्डो पोर्तुगाल संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. 2006 च्या फिफा वर्ल्ड कपनंतर जर्मनी प्रथमच मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करत आहे.
यंदा स्पर्धेच्या 'ब' गटात इटलीसह स्पेन आणि क्रोएशिया यांचा समावेश आहे. त्याला 'ग्रुप ऑफ डेथ' असेही म्हटले जात आहे. इटली 16 जून रोजी अल्बेनियाविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. किलियन एमबाप्पेचा फ्रान्स संघ फेव्हरेट मानला जात आहे. फ्रान्स संघ 18 जून रोजी ऑस्ट्रियामध्ये स्पर्धेला सुरुवात करेल. त्याचवेळी सर्व चाहत्यांच्या नजरा जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोवर असतील. तो दुसऱ्यांदा युरो कप जिंकण्याच्या तयारीने मैदानात उतरेल. 2016 मध्ये झालेला युरो कप पोर्तुगालने पटकावला होता. पोर्तुगाल संघ आपला पहिला सामना 19 जून रोजी चेक प्रजासत्ताक विरुद्ध खेळणार आहे.
लाईव्ह स्ट्रिमिंगबद्दल संपूर्ण माहिती
युरो कप 2024 15 जून 2024 रोजी रात्री उशीरा सुरू होईल (भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता)
पहिल्या फेरीसाठी काही दिवस दोन सामने तर काही दिवशी तीन सामने खेळवले जातील. पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता, दुसरा सामना रात्री 9.30 वाजता आणि तिसरा सामना रात्री उशिरा 12.30 वाजता सुरू होईल.
UEFA युरो कप 2024 जर्मनीमध्ये खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील सामने जर्मनीतील डॉर्टमंड, म्युनिक, कोलोन, स्टुटगार्ट, हॅम्बर्ग, लाइपझिग, फ्रँकफर्ट, गेल्सेनकिर्चेन आणि डसेलडॉर्फ या मैदानांवर खेळवले जाणार आहेत.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे UEFA युरो कप 2024 सामन्यांचे थेट कव्हरेज करणार आहे.
UEFA युरो कप 202 सामन्यांचे थेट प्रवाह SonyLiv ॲपवर उपलब्ध असेल.