

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत 2025 च्या 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सलग दुस-यांदा धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघाने इंग्लंडचा 9 विकेट्सने पराभव केला. शुक्रवारी (31 जानेवारी) क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 114 धावांची गरज होती. हे लक्ष्य टीम इंडियाच्या मुलींनी 1 विकेट गमावून आणि 30 चेंडू राखून आरामात गाठले. टीम इंडियासाठी जी कमलिनीने शानदार कामगिरी केली. तिने 50 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली. (U19 Women’s T20 World Cup Team India Final)
आता विजेतेपदाच्या लढतीत गतविजेता भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने असतील. हा सामना 2 फेब्रुवारी (रविवार) रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता याच मैदानावर खेळला जाणार आहे.
इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना त्यांना 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 113 धावा करता आल्या. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली पण भारतीय संघाने मधल्या षटकांमध्ये पुनरागमन केले. ज्यामुळे इंग्लंड संघाला फक्त 113 धावा करता आल्या. इंग्लंडकडून सलामीवीर डेविना पेरिनने 45 धावांची खेळी केली. तिने 40 चेंडूंचा सामना केला आणि 6 चौकार आणि 2 षटकार मारले. तर तिची सहकारी फलंदाज जेमिमा स्पेन्सने 9 धावांचे योगदान दिले. त्यानंतर जॉन्सन खाते न उघडताच बाद झाली.
अबी नॉरग्रोव्हने काही काळ सावधगिरीने खेळ केलाला. पण तीही 30 च्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाली. तिने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. शेवटी, अमू सुरेनकुमारने 14 धावांची खेळी खेळून संघाला 110 च्या पुढे नेले. भारताकडून पारुनिका सिसोदियाने शानदार गोलंदाजी केली आणि 21 धावा देत 3 बळी घेतले. वैष्णवी शर्माची जादू पुन्हा एकदा दिसली. तिने 23 धावा देत 3 बळी घेतले. तर आयुषीने दोन विकेट घेतल्या.
भारताला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 114 धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला कोणतीही अडचण आली नाही. गोंगाडी त्रिशाने तिच्याच आक्रमक शैलीत खेळ करून धमाकेदार सुरुवात केली. तिने 29 चेंडूत 35 धावांची खेळी केली. तर तिची सलामी जोडीदार जी कमलिनीने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. तिने 56 धावांची नाबाद खेळी केली. त्रिशा बाद झाल्यानंतर सानिका चालकेने कमलिनीला चांगली साथ दिली. सानिकाने नाबाद 11 धावा केल्या. कमलिनीच्या बॅटमधून विजयी चौकार आला. यासह, भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडकडून ब्रेटला एकमेव विकेट मिळाली.
2025 च्या 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकात टीम इंडियाने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. भारताने साखळी फेरी आणि सुपर सिक्स फेरीत वेस्ट इंडिज, मलेशिया, श्रीलंका, बांगलादेश आणि स्कॉटलंडचा पराभव केला. तर सेमीफायनलमध्ये इंग्लंडला मात दिली.