

दुबई : दुबई येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक स्पर्धेत (U19 Asia Cup) मंगळवारी १७ वर्षीय भारतीय फलंदाजाने इतिहास रचला. अभिज्ञान कुंडू (Abhigyan Kundu) याने मलेशियाविरुद्धच्या सामन्यात चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात द्विशतक ठोकणारा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा फलंदाज बनण्याचा मान मिळवला.
या सामन्यात मलेशिया अंडर-१९ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अभिज्ञान कुंडूच्या ऐतिहासिक खेळीपुढे त्यांचा निर्णय फिका पडला. कुंडू हा युवा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला, तर जागतिक स्तरावर तो असा पराक्रम करणारा दुसराच फलंदाज ठरला आहे.
भारताची सुरुवात काहीशी डळमळीत झाली. कर्णधार आयुष म्हात्रे (१४ धावा) आणि विहान मल्होत्रा (७ धावा) लवकर बाद झाले. मात्र, वैभव सूर्यवंशी (२६ चेंडूत ५० धावा) आणि वेदांत त्रिवेदी (१०६ चेंडूत ९० धावा) यांनी डाव सावरला. ११ व्या षटकात सूर्यवंशी बाद झाला, तेव्हा भारताची धावसंख्या ३ बाद ८७ होती. यानंतर अभिज्ञान कुंडू मैदानात उतरला आणि त्याने पहिल्या चेंडूपासूनच धावा काढण्यास सुरुवात केली.
कुंड़ूने केवळ ४४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने वेदांत त्रिवेदीसोबत मिळून भारताचा डाव मजबूत केला. या दोघांनी २९.३ षटके क्रीझवर थांबून २०९ धावांची जबरदस्त भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताचा धावफलक वेगाने पुढे सरकला. त्रिवेदी बाद झाल्यानंतरही कुंडू थांबला नाही. त्याने मग कनिष्क चौहानसोबत अवघ्या ३६ चेंडूंमध्ये आणखी ८७ धावांची भर घातली.
डाव्या हाताच्या या फलंदाजाने ८० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने आक्रमक रूप धारण केले आणि केवळ १२१ चेंडूंमध्ये ऐतिहासिक द्विशतक झळकावले.
अभिज्ञान कुंडूने आपल्या नाबाद २०९ धावांच्या खेळीत १७ चौकार आणि ९ उत्तुंग षटकार मारले. या खेळीने त्याने अंबाती रायडूचा १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेटमधील भारतीयासाठीचा सर्वोच्च धावसंख्येचा (नाबाद १७७ धावा) विक्रम मोडीत काढला.
युवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तो जगातील केवळ दुसराच फलंदाज ठरला. यापूर्वी, २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जोरिच व्हॅन स्कॉकविक याने झिम्बाब्वेविरुद्ध १५३ चेंडूत २१२ धावा केल्या होत्या.
अभिज्ञान कुंडूच्या या अविश्वसनीय कामगिरीमुळे भारतीय संघाला मोठा स्कोअर उभारता आला असून, आता मलेशियासाठी हे लक्ष्य गाठणे खूपच कठीण झाले आहे.
जोरिच व्हॅन स्कॉकविक (द. आफ्रिका) : २१५ : विरुद्ध झिम्बाब्वे : २५ जुलै २०२५ (हरारे)
अभिज्ञान कुंडू (भारत) : २०९* : विरुद्ध मलेशिया : १६ डिसेंबर २०२५ (दुबई)
हसिथा बोयागोडा (श्रीलंका) : १९१ : विरुद्ध केनिया : २३ जानेवारी २०१८ (लिंकन)
जॅकोब भुल्ला (न्यूझीलंड) : १८० : विरुद्ध केनिया : १७ जानेवारी २०१८ (ख्राइस्टचर्च)
थिओ डोरोपोलोस (ऑस्ट्रेलिया) : १७९* : विरुद्ध इंग्लंड : ११ फेब्रुवारी २००३ (सिडनी)
अंबाती रायडू (भारत) : १७७* : विरुद्ध इंग्लंड : ३० ऑगस्ट २००२ (टॉन्टन)