

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका शुक्रवारपासून सुरू होत आहे. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार टॉम लॅथम हाताच्या फ्रॅक्चरमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व अष्टपैलू मायकल ब्रेसवेललडे सोपवण्यात आले आहे. पहिला एकदिवसीय सामना नेपियरमध्ये खेळला जाणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले की, लॅथमला सरावादरम्यान उजव्या हाताला दुखापत झाली. त्याचा हात फ्रॅक्चर झाला असून त्याला बरे होण्यासाठी चार आठवडे लागू शकतात. एक्स-रे रिपोर्टमध्ये गंभीर दुखापत झाल्याची पुष्टी झाली आहे. या काळात त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. लॅथमच्या जागी हेन्री निकोल्सचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. तर संघाचे नेतृत्व मायकेल ब्रेसवेलकडे सोपवण्यात आले आहे.
न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, ‘मालिकेच्या पूर्वसंध्येला कर्णधार टॉम लॅथम जखमी झाल्याचे पाहणे निश्चितच निराशाजनक आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करतो. लॅथमच्या अनुपस्थितीत मायकेल ब्रेसवेल कर्णधार असेल. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने टी-20 मालिकेत शानदार कामगिरी केली. हे यश तो वनडे मालिकेतही कायम ठेवेल असा विश्वास मला वाटतो.’
लॅथमच्या अनुपस्थितीत मिच यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. यावेळी निक केली आणि मोहम्मद अब्बास यांना पदार्पणाची संधी मिळू शकते.
‘हेन्री निकोल्सचे तीन महिन्यांनंतर दुखापतीतून पुनरागमन झाले आहे. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि सहा डावांमध्ये पाच अर्धशतके झळकावली. या मालिकेत आम्हाला लवचिक राहावे लागेल कारण अनेक खेळाडू विविध कारणांमुळे उपलब्ध नाहीत. शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विल यंग खेळणार नाही. तो वडील होणार आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला सुट्टी मंजूर केली आहे. त्याच्या जागी कॅन्टरबरीचा फलंदाज रिस मार्यू याला पहिल्यांदाच संघात स्थान देण्यात आले आहे. या मालिकेत खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल,’ असेही स्टीड यांनी सांगितले.