

नगर : पुढारी वृत्तसेवा
अहिल्यानगर येथे फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात झाली. त्यात पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केले. मात्र, पंचांच्या निर्णयावर आपेक्ष घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष प्रा. विलास कथुरे यांच्या समितीने पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. या अहवालानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेने पंच नितीश काबलिया यांच्यावर तीन वर्षांची बंद घालण्यात आली आहे.
संघटनेने सोमवारी (दि. 14) रोजी निर्णय घेतला. अहिल्यानगर शहरामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरला. मात्र, पंचांच्या निर्णयाने ही स्पर्धा वादळी ठरली. गादी विभागात अंतिम कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. पहिल्या चाळीस सेकंदात पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षे याला डाक मारून धोकादायक स्थितीमध्ये पकडून ठेवले.
यावेळी गादीवर पंच नितेश काबलिया होते. त्यांनी साईडपंचांकडे कुस्ती (मत) मागितली. आखाड्याच्या चोहोबाजूंनी प्रचंड गर्दी असल्याने साईड पंचांना काही दिसत नव्हते. त्याचवेळी पंच काबलिया यांनी चितपट कुस्तीचा निकाल दिला. त्यामुळे मैदानावर प्रचंड गोंधळ झाला. पैलवान शिवराज राक्षे पंचांच्या निर्णयावर नाराज होऊन त्याने पंच काबलिया यांना मारहाण केली. त्यावर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाकडून शिवराज राक्षे यावर शिस्तभंगाची कारवाई करीत तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.
गादीवरील कुस्ती वादग्रस्त ठरल्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या चौकशी समितीने 28 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य कुस्तीगीर संघाला अहवाल सादर केला. या अहवालामध्ये चुकीच्या निर्णयाचा ठपका आखाडा पंच नितेश काबलिया यांच्यावर ठेवण्यात आला. कुस्तीच्या व्हिडीओमध्ये अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. कुस्तीमध्ये पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचे समितीच्या लक्षात आले. समितीने 14 एप्रिल 2025 रोजी पत्रक काढून पंच नितेश काबलिया यांच्यावर तीन वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांना मारहाण केल्याने डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आता चौकशी समितीच्या अहवालात पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. पंचांनी केलेल्या चुकींमुळे मल्लांचे आयुष्य पणाला लागले आहे.
कुस्तीस मुख्य पंच संभाजीनगरचे नितीश काबलिया, मॅट चेअरमन सोलापूरचे दत्तात्रय माने व साईड पंच म्हणून सांगलीचे विवेक नाईकल काम पाहत होते. तसेच अपिल ऑफ ज्युरी म्हणून अहिल्यानगरचे संभाजी निकाळजे व सांगलीचे नामदेव बडरे काम पाहत होते.
पृथ्वीराज मोहोळने ढाक मारल्यानंतर मुख्य पंच काबलिया यांनी मॅट चेअरमन व साईड पंच यांच्याकडे कुस्ती (मत) मागितली. वास्तविक, शिवराजची ती स्थिती बिलकुल कुस्ती मागण्याची नव्हती हे व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येते. परंतु, गोंधळलेल्या मनःस्थितीत मुख्य पंच काबलिया यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय चुकीचा असल्याचे लक्षात येते.
मुख्य पंच काबलिया यांनी मॅट चेअरमन दत्तात्रय माने यांना कुस्ती मागितल्यानंतर दत्तात्रय माने यांना शिवराजच्या पाठीची बाजू स्पष्ट दिसत नसल्याने त्यांनी मुख्य पंच काबलिया यांना साईड पंचांची सहमती घेण्यास सांगणे हा निर्णय अतिशय योग्य आहे. तद्नंतर स्वतःला स्पष्ट दिसत नसल्याने साईड पंच व मुख्य पंच यांनी एकत्रित घेतलेल्या निर्णयास सहमती देणे हा निर्णयसुद्धा योग्यच आहे. त्यामुळे मॅट चेअरमन दत्तात्रय माने हे दोषी आढळून येत नाही.
मॅट चेअरमन दत्तात्रय माने यांनी साईड पंच विवेक नाईकल यांच्याकडे हाथ करून त्यांच्याकडे कुस्ती मागण्याचा सल्ला काबलिया यांना दिला. त्यावेळी शिवराज हा धोकादायक स्थितीत होता, पाठीचा भाग हा विवेक नाईकल यांना दिसत नव्हता. मैदानावर प्रचंड गर्दी असल्याने साईड पंचास उठून कुस्ती पाहण्यास जाणे शक्य नव्हते. विवेकच्या दिशेने दिसत असलेल्या कुस्तीच्या फोटो व व्हिडीओ पाहिल्यानंतर साईड पंच विवेक नाईकल दोषी आढळून येत नाही.
चितपटीच्या निर्णयास तिन्ही पंचांची सहमती असल्याने अपील ऑफ ज्युरी यांनी जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमास अधिन राहून घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. त्यामुळे अपील ऑफ ज्युरी दोषी आढळून येत नाही.
सुरुवातीपासूनच आम्ही पंच चुकत असल्याचे सांगत होतो. परंतु, त्यावेळी विश्वास ठेवण्यात आला नाही. केवळ तीन वर्षांची निलंबनाची बंदी घालण्याऐवजी संबंधित पंचावर कायमस्वरूपी बंदी घालावी. इतर अनेक खेळांत अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे.
- काका पवार (अर्जुन पुरस्कार विजेते)