पुढारी ऑनलाईन डेस्क : महान टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal announces retirement) याने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. नदालने त्याच्या टेनिस कारकिर्दीत २२ ग्रँड स्लॅम (22 Grand Slam titles) विजेतेपदे जिंकली आहे. स्पेनच्या या महान खेळाडूने X वर पोस्ट करत व्हिडीओद्वारे निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
नदालचे विशेषत: क्ले कोर्टवर वर्चस्व राहिले. त्याला फ्रेंच ओपनचा बादशहा मानले जाते. त्याने १२ वेळा फ्रेंच ओपन (French Open) स्पर्धा जिंकली. ऑस्ट्रेलिया आणि विम्बल्डन प्रत्येकी दोनवेळा आणि अमेरिकेन ओपन ग्रँडस्लॅमवर चारवेळा आपले नाव कोरले आहे. ऑलिम्पिकमध्ये २००८ आणि २०१६ मध्ये टेनिस दुहेरीतील सुवर्णपदक जिंकले होते. २००४, २००९ आणि २०११ आणि २०१९ मध्ये डेव्हिस कप जिंकणाऱ्या संघात त्याचा समावेश होता. २००८ मध्ये पहिल्यांदाच विम्बल्डन जिंकत टेनिस मानांकनात अग्रस्थानी पोहोचला होता.
नदालची शेवटची स्पर्धा ही नोव्हेंबरमध्ये मलागा येथे होणारी डेव्हिस कप फायनल असेल. त्यानंतर तो व्यावसायिक टेनिसचा निरोप घेईल. १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान डेव्हिस कपच्या उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा सामना नेदरलँड्सशी होणार आहे. नदाल दुखापतीतून बरा झाल्यानंतर त्याला संघात सामील करण्यात आले आहे. २००४ मध्ये नदालने स्पेनला डेव्हिस कप जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. याचा उल्लेख त्याने निवृत्ती जाहीर करताना केला आहे.