जो रुटने पाकिस्तानला धू धू धुतले! विराटच्‍या पंक्तीत स्थान मिळवले

Pakistan vs England Test : मुलतान कसोटीत ३०५ चेंडूत झळकावले द्विशतक!
Pakistan vs England Test
जाे रुट याने पाकिस्‍तानविरुद्ध मुलतान कसोटी सामन्‍यात आपल्‍या कारकीर्दीतील सहावे कसोटी द्विशतक झळकावले.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंग्‍लंडचा स्‍टार फलंदाज जो रुट ( Joe Root) याची धडाकेबाज फलंदाजी सुरुच आहे. पाकिस्‍तानविरुद्ध मुलतान कसोटी सामन्‍यात आपल्‍या कारकीर्दीतील सहावे कसोटी द्विशतक झळकावत त्‍याने आपल्‍या नावावर आज (दि.१०) आणखी एका विक्रमाची नोंद केली. (Pakistan vs England Test) क्रिकेटच्‍या सर्व फॉरमॅटमध्ये 20,000 धावा करणारा पहिला इंग्लंडचा फलंदाज बनला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावांचा टप्पा पार करणारा रूट हा सध्‍या खेळणार्‍या फलंदाजांमधील दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे.

३०५ चेंडूत झळकावले द्विशतक

इंग्लंडचा स्टार कसोटी फलंदाज जो रूट याने सर्वाधिक प्रदीर्घ फॉर्मेटमध्ये सहावे द्विशतक झळकावले आणि मुलतानमधील मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवले. पाकिस्तानमध्ये पहिले शतक झळकावल्यानंतर रूटने 305 चेंडूत द्विशतक झळकावले आहे. आज बाबर आझमने १८६ धावांवर फलंदाजी करत असताना रुटचा झेल सोडला. रूटने त्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला आणि पाकिस्तानविरुद्ध प्रदीर्घ फॉर्मेटमध्ये आणखी एक शानदार टप्पा गाठला. त्‍याने आपल्‍या कारकीर्दीतील सहावे कसोटी द्विशतक झळकावले. जो रुटला आघा सलमानने २६२ धावांवर पायचीत केले. रुटच्‍या खेळीचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे त्‍याने ३७५ चेंडूचा सामना केला. त्‍याने १७ चौकार फटकावले. मात्र त्‍याची षटकाराची पाटी कोरीच राहिली. त्‍याने इंग्लंडसाठी सर्वाधिक दुहेरी शतके ठोकण्याचा ॲलिस्टर कूकचा विक्रम मोडला. होता इंग्‍लंडच्‍या कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा माजी कर्णधार ॲलिस्‍टर कुकच्‍या नावावर होत्‍या. त्‍याने 161 कसोटी सामन्‍यांमध्‍ये १२,४७२ धावा केल्या होत्‍या. रुटने आपल्या 147व्या कसोटी सामन्यातच हा टप्पा गाठला आहे. ३३ वर्षीय रूट वॉल्टर हॅमंडच्या इंग्लंडसाठी एका कसोटीत सात दुहेरी शतके झळकावण्याच्या यादीत फक्‍त एका क्रमांकाने मागे आहे.

इंग्लंडसाठी सर्वाधिक द्विशतक झळकवणारा दुसरा फलंदाज

  • वॉल्टर हॅमंड - ७

  • जो रूट - ६

  • ॲलिस्टर कुक - ६

  • लिओनार्ड हटन - ४

सर्व फॉरमॅटमध्ये 20,000 धावा करणारा पहिला इंग्लंडचा फलंदाज

मुलतान कसाेटीतील चौथ्या दिवशी १८३ धावांचा टप्‍पा ओलांडल्‍यानंतर जाे रुट हा सर्व फॉरमॅटमध्ये 20,000 धावा करणारा पहिला इंग्लंडचा फलंदाज बनला आहे विराट कोहलीनंतर हा टप्पा गाठणारा तो सध्या दुसरा सक्रिय क्रिकेटपटू आहे. सर्व फॉरमॅटमध्ये 20,000 धावा करण्याचा टप्पा गाठणारा तो एबी डिव्हिलियर्सनंतरचा 13वा आणि पहिला खेळाडू आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा (सक्रिय फलंदाज )

विराट कोहली- सामने 535, धावा 27,041

जो रूट- सामने 350, धावा 20,000 धावा*

इंग्‍लंडचा नवा 'विक्रमादित्‍य' जाे रुट

जो रुट हा कसोटी क्रिकेट फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. पहिल्या स्थानावर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (15,921 धावा) आाहे, तर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (13,378 धावा), जॅक कॅलिस (13,289 धावा) आणि भारताचा राहुल द्रविड (13,288 धावा) हे अनुक्रमे दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्‍या स्‍थानावर आहेत.कसोटी सामन्‍याच्‍या दुसऱ्या दिवशी रूटने आणखी एक विक्रम आपल्‍या नावावर केला होता. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) इतिहासात 5,000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. मुलतान कसोटीपूर्वी त्याला हा टप्पा गाठण्यासाठी फक्त २७ धावांची गरज होती. रूट इतरांपेक्षा खूप पुढे आहे. WTC मध्ये अद्याप कोणत्याही फलंदाजाने 4,000 धावा केल्या नाहीत. मार्नस लॅबुशेन (४५ कसोटीत ३,९०४ धावा) त्यानंतर स्टीव्ह स्मिथ (४५ कसोटीत ३,४८६ धावा), बेन स्टोक्स (४८ कसोटीत ३,१९१ धावा) यांचा क्रमांक लागतो.

इंग्लंडसाठी सर्वाधिक शतकी खेळी करणारा फलंदाज

1877 मध्ये कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली, तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच 147 वर्षांत जो रूट हा इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे. नुकत्‍याच श्रीलंकेविरुद्धच्‍या दुसऱ्या कसोटीत रूटने पहिल्या डावात 33वे कसोटी शतक तर दुसऱ्या डावात 34वे कसोटी शतक झळकावले आहे. 34व्या शतकासह त्याने आपल्‍याच देशातील ॲलिस्टर कुक (33 शतके) यांला मागे टाकले आहे.

सचिनच्‍या विश्‍वविक्रमापासून किती दूर?

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. त्‍याने आपल्‍या कसोटी क्रिकेटच्‍या कारकीर्दीत २०० सामन्‍यांत ५३.७८ च्‍या सरासरीने ५१ शतके आणि ६८ अर्धशतकांसह १५९२१ धावा केल्‍या आहेत. डिसेंबरमध्ये जो रुट 34 वर्षांचा होईल. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता. तो पुढील तीन वर्ष सलग खेळेल, असे मानले जाते. या तीन वर्षांमध्‍ये त्‍याने आपल्‍या फलंदाजीत कमालीचे सातत्‍य ठेवले तरच त्‍याला सचिनचा विक्रम मोडण्‍याची संधी असेल. सध्‍या तरी कसोटी सामन्यांमध्‍ये त्‍याचे धावांमधील सातत्‍य हे समकालीन फलंदाजांपेक्षा सरस आहे. २०२० म्‍हणजे मागील चार वर्षांचा विचार करता विराट कोहली, केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्‍या पेक्षा रुटने सर्वाधिक म्‍हणजे ५७ कसोटी सामने खेळले आहेत. आता आपल्‍या कारकीर्दीच्‍या अखेरच्‍या टप्‍प्‍यावर त्‍याला झंझावती फलंदाजी कायम ठेवावी लागणार आहे.

रुटचे कमालीचे सातत्‍य

आकडेवारीवरुन स्‍पष्‍ट होते की, जो रूटच्‍या फलंदाजीत २०२१ पासून कमालीचे सातत्‍य आहे. त्याने आपल्‍या ३३ अर्धशतकी खेळींपैकी १८ खेळींचे रुपांतर शतकांमध्‍ये केले आहे. क्रिकेट हा खेळ आंतरराष्‍ट्रीय पातळीवर खेळणार्‍या १० देशांपैकी सात देशांमध्ये रुटने सरासरी 45 पेक्षा जास्त धावा केल्‍या आहेत. केवळ ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना त्याला संघर्ष करावा लागला असल्‍याचे आकडेवारी सांगते. येथे त्याने 14 सामन्यांत 35.68 सरासरीने नऊ अर्धशतक झळकावत केवळ 892 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने खेळलेल्या सर्व दहा देशांमध्ये धावांची सरासरी ४० पेक्षा अधिक आहे. सचिनने कसोटी सामन्‍यात जगभरातील सर्वच मैदाने गाजवली आहेत. रूटला कसोटी क्रिकेटमध्‍ये सचिनच्‍या धावांशी बरोबरी करण्‍यात मोठा टप्‍पा पार करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news