

वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने (team India) निर्भेळ यश मिळवत सहाही सामने जिंकले. या दोन्ही विजयाने अनेक गोष्टी साध्य झाल्याचे दिसत आहे. या मालिकांपूर्वी भारतीय संघात विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत वाद- विवाद रंगला होता. या वादाच्या छायेतच हा संघ दक्षिण आफ्रिका दौर्यावर गेला. परंतु, तेथे कसोटी आणि टी-20 या दोन्ही मालिकेत पराभूत होऊन मायदेशी परतला. त्यानंतर ही मालिका झाली. रोहित शर्मा याची पूर्णवेळ कर्णधार म्हणून दोन्ही पहिल्याच मालिका होत्या.
आयपीएलची पाच विजेतेपद मिळवणार्या रोहितच्या कर्णधारपदावर आता शंका घेण्यासारखे काहीच उरले नसले तरी या दोन्ही मालिकेत त्याने ज्या पद्धतीने नेतृत्त्व केले. ते पाहून टीकाकारांची बोटे त्यांच्याच तोंडात गेली. मालिकेतून आपण किती विक्रम नोंदवले, हा आकडेवारीचा भाग बाजूला ठेवून या विजयाचे अवलोकन केले तर आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघबांधणीची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे यातून समोर आले.
यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत (team India) साखळी फेरीतच बाहेर पडला. त्याहून वाईट म्हणजे आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून आपण पराभूत झालो. या पराभवाचे एकमेव कारण म्हणजे भारतीय संघामध्ये असलेला संघ संयोजनाचा अभाव. हार्दिक पंड्याला फिट नसताना आपण दौर्यावर नेला. तो गोलंदाजी करणार नसतानाही त्याला खेळवण्याचा अट्टहास केला. चौथ्या क्रमांकाच्या नाट्याचे नवनवीन प्रयोग आपण केले. याचा परिणाम म्हणजे आपल्याच यजमानपदाखाली होणार्या स्पर्धेतून आपण हात हलवत परत आलो; पण या चुकांमधून शिकण्याची संधी पुन्हा आपल्याला मिळाली आहे.
पुढचा विश्वचषक अवघ्या आठ महिन्यांवर आला आहे. त्यासाठी संघबांधणी करण्याची हीच योग्य वेळ आहे. भारतीय संघ सध्या स्थित्यंतराच्या टप्प्यावर आहे. काही ज्येष्ठांना नारळ देत नव्या रक्ताला वाव देण्यासाठी अशा मालिकांचा उपयोग करून घ्यायला हवा. सुदैवाने आपण त्या स्थितीत आता आहोत. विंडीजविरुद्धच्या मालिकेने आपल्याला हे जाणवून दिले.
संघातील प्रत्येक जागेसाठी दोन दोन दावेदार असणे आणि एकजण रांगेत उभा असणे ही समृद्धी आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेतून सर्वात चांगली गोष्ट पुढे आली असली तर ती म्हणजे सूर्यकुमार यादवच्या रूपाने चौथ्या क्रमांकावर अतिशय परफेक्ट फलंदाज आपल्याला मिळाला आहे आणि दुसरे म्हणजे हार्दिक पंड्याचा पर्याय आपण शोधत होतो, तो व्यंकटेश अय्यरच्या रूपाने आपल्याला गवसला आहे.
आधुनिक क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंना महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतामध्ये जे फिरकी अष्टपैलू भरपूर झाले; परंतु मध्यमगती गोलंदाज आणि भरवशाचा फलंदाज असा खेळाडू कपिलदेवनंतर तयार झाला नाही. इरफान पठाण या कॅटेगरीत बसणारा खेळाडू होता; परंतु ग्रेग चॅपेलनी त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करून त्याच्यातील फलंदाज संपवला आणि वसिम अक्रमने त्याला स्पीडच्या मागे धावायला लावून त्याचा स्विंग विसरायला लावला. त्यानंतर हार्दिक पंड्याचे (अल्प) युग आले.
आयपीएलमधून गवसलेला हा हीरा आंतरराष्ट्रीय कोंदणात मात्र फिट बसला नाही. दुखापती आणि काहीसा अहंमपणा यामुळे तो क्रिकेटमधून बाहेर फेकला गेला आहे. तो पुनरागमन करेल; पण तेव्हा कदाचित वेळ निघून गेली असेल. कारण आता व्यंकटेशने त्याची जागा घेतली आहे. पुढे शिवम दुबे, शिवम मावी असे अनेकजण रांगेत आहेत. गोलंदाजीत बुमराह, शमी असे खेळाडू नसले तरी आपण जिंकू शकतो. हे युवा खेळाडूंनी दाखवून दिले आहे. एकूणच संघबांधणीची गाडी योग्य दिशेने धावत असल्याचे चित्र आहे.