

मुंबई : भारतीय टी-२० क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या रूपाने एका नवीन युगाचा उदय झाला असून, कर्णधारपदाची धुरा आता त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या बदलासोबतच संघात तरुण आणि स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीचे आगमन झाले आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर स्वतःची छाप पाडत वैभवने भारतीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता आयर्लंडविरुद्धच्या मालिकेने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे, त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर पाच टी-२० सामन्यांची महत्त्वपूर्ण मालिका खेळली जाणार आहे.
संघाच्या रचनेत मोठे बदल न करता, निवड समितीने अनुभवी कुलदीप यादवऐवजी रवी बिश्नोईवर विश्वास दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. फिरकी गोलंदाजीची धुरा रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती यांच्या खांद्यावर असेल. संघात श्रेयस, वैभव आणि रवी यांच्या समावेशानंतर प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारण्यासाठी 'बेस्ट प्लेइंग इलेव्हन' कशी असावी, याबाबत एआयने (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) एक सविस्तर विश्लेषण केले आहे.
एआयच्या निवडीनुसार, वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा हे दोघे डावाची सुरुवात करताना दिसतील. तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्माची जागा निश्चित करण्यात आली असून, स्वतः कर्णधार श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. पाचव्या क्रमांकासाठी संजू सॅमसन किंवा इशान किशन या दोघांपैकी एकाची निवड करण्याचे सुचवण्यात आले आहे.
जेव्हा एआयला विचारण्यात आले की, संजू किंवा इशान यांना पाचव्या क्रमांकावर का ठेवले आहे, तेव्हा स्पष्टीकरण देताना एआयने म्हटले की, संघाचे सलामीचे स्लॉट सध्या पूर्णपणे भरलेले आहेत. वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये केलेल्या धमाकेदार कामगिरीनंतर त्याला सलामीच्या जागेवरून हटवणे कठीण आहे. तसेच, त्याच्या जोडीला अभिषेक शर्मा आणि तिसऱ्या क्रमांकावर उपकर्णधार तिलक वर्मा यांची जागा भक्कम आहे. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर असल्यामुळे, पहिल्या चार क्रमांकांमध्ये कोणताही बदल करणे सध्याच्या घडीला कठीण आहे. त्यामुळे, यष्टीरक्षक म्हणून जो कोणी खेळाडू संघात असेल, त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल.
एआयच्या मते, कागदावर संजू किंवा इशान हे पाचव्या क्रमांकावर दिसत असले, तरी टी-२० हा परिस्थितीनुसार खेळला जाणारा खेळ आहे. जर पॉवरप्लेमध्येच भारतीय संघाचे लवकर बळी पडले, तर कर्णधार श्रेयस अय्यर आपली लवचिकता दाखवत संजू किंवा इशानला 'पिंच हिटर' म्हणून तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर बढती देऊ शकतो. मात्र, संघाला जर चांगली सुरुवात मिळाली, तर हे दोन्ही खेळाडू फिनिशरच्या भूमिकेत पाचव्या क्रमांकावरच फलंदाजी करताना दिसतील. याशिवाय, सहाव्या क्रमांकासाठी शिवम दुबे किंवा नितीश कुमार रेड्डी यांच्यापैकी एकाची निवड करणे फायदेशीर ठरेल, असे मत एआयने व्यक्त केले आहे.