पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli 27000 Runs : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. ग्रीन पार्क स्टेडियमवर भारताच्या पहिल्या डावात विराटने 47 धावा केल्या. यादरम्यान त्याने 35वी धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 27,000 धावा पूर्ण केल्या. हा आकडा गाठणारा तो भारताचा फक्त दुसरा आणि जगातील चौथा फलंदाज ठरला आहे.
कोहलीने 535 सामन्यांच्या 594 डावांमध्ये 27 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने सर्वात कमी डावात हा आकडा गाठला आहे. कोहली आता सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंग यांच्या यादीत सामील झाला आहे. तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 34,357 धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ संगकारा (28,016) आणि पाँटिंग (27,483) यांचा क्रमांक लागतो. सचिन आणि कोहली व्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,000 धावाही पूर्ण केल्या नाहीत.
कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 115 सामन्यांच्या 194 डावांमध्ये सुमारे 50 च्या उत्कृष्ट सरासरीने 8,900 हून अधिक धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने 29 शतके झळकावली आहेत. त्याने धावांच्या बाबतीत इंग्लंडच्या ग्रॅहम गूचला (8,900) मागे टाकले आहे. कोहली सध्या कसोटी फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील 18 वा फलंदाज आहे. भारतात त्याच्यापेक्षा जास्त कसोटी धावा सचिन तेंडुलकर (15,921), राहुल द्रविड (13,265) आणि सुनील गावस्कर (10,122) यांनी केल्या आहेत.