

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने भारताचा अवघ्या ४ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याच्या भारताच्या आशा अजूनही कायम आहेत.
रविवारी इंदूर येथील होळकर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा ४ धावांनी पराभव करून महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने कर्णधार हीथर नाईट हिच्या ९१ चेंडूंतील १०९ धावांच्या (१५ चौकार, १ षटकार) शानदार शतकी खेळीमुळे ५० षटकांत ८ गडी गमावून २८८ धावा उभारल्या. विशेष म्हणजे, हा नाईटचा ३०० वा एकदिवसीय सामना होता. एमी जोन्सनेही ५६ धावांचे (६८ चेंडू, ८ चौकार) महत्त्वपूर्ण योगदान दिले.
४५ व्या षटकात इंग्लंडची धावसंख्या ३ बाद २४९ अशी होती, मात्र ऑफस्पिनर दीप्ती शर्मा (४/५१) आणि पदार्पण करणारी गोलंदाज श्री चरणी (२/६८) यांनी अंतिम पाच षटकांत ५ बळी मिळवले. ज्यामुळे इंग्लंडच्या धावसंख्येला ३०० च्या आत रोखण्यात यश आले. प्रत्युत्तरात, भारतीय महिला संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना (८८), कर्णधार हरमनप्रीत कौर (७०) आणि दीप्ती शर्मा (५०) यांच्या अर्धशतकी खेळींमुळे भारताने कडवी लढत दिली, परंतु ५० षटकांत ६ गडी गमावून केवळ २८४ धावांपर्यंतच मजल मारता आली.
या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ यापूर्वीच अंतिम चारमध्ये पोहोचले आहेत. दुसरीकडे, भारतीय महिला संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. यापूर्वी त्यांना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडूनही पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भारत आता 'करो या मरो' अशा स्थितीत आहे. या विश्वचषकात भारतीय महिला संघाने खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये फक्त पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरुद्धच विजय मिळवला आहे. असे असले तरी, भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतो.
सध्या उपांत्य फेरीतील एक स्थान रिक्त आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा पुढील सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गुणतालिकेत सध्या भारत चौथ्या, तर न्यूझीलंड पाचव्या स्थानी आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी चार गुण असले तरी, भारताचा नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा किंचित चांगला आहे. जर भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला, तर ते थेट उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघ न्यूझीलंडकडून पराभूत झाला, तरीही त्यांच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाची शक्यता कायम राहू शकते. यासाठी, भारताला स्पर्धेतील अखेरच्या टप्प्यात असलेल्या बांग्लादेशचा पराभव करावा लागेल आणि न्यूझीलंडने लीग फेरीतील त्यांच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागेल.