Team India Champion : चॅम्पियन टीम इंडिया! 17 वर्षांनी जिंकला टी-20 विश्वचषक

भारतीय संघाने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला
Team India Champion
भारतीय संघाने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Champion : टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळला गेला. हा सामना जिंकून टीम इंडियाने 11 वर्षांपासून सुरू असलेला ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. त्याचवेळी भारतीय संघाने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. टीम इंडियाने यापूर्वी 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते.

टीम इंडियाने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 7 गडी गमावून 176 धावा केल्या. कोरड्या आणि संथ खेळपट्टीवर पॉवरप्लेमध्ये 3 बाद 34 अशी घसरण झाल्यानंतर, भारतीय फलंदाजांनी दमदार पुनरागमन केले आणि टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये सर्वोच्च धावसंख्या केली. या इनिंगमध्ये विराट कोहलीने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने 59 चेंडूत 76 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. तर अक्षर पटेलने 31 चेंडूत 47 धावांचे योगदान दिले. अक्षर पटेलने या खेळीत 1 चौकार आणि 4 षटकार ठोकले. दुसरीकडे, शिवम दुबेनेही 16 चेंडूत 27 धावांची खेळी केली.

गोलंदाजांनी टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला

177 धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकात 8 विकेट गमावून केवळ 169 धावा करता आल्या आणि भारतीय संघाने 7 धावांनी सामना जिंकला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या विजयाचे सर्वात मोठे हिरो ठरले. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी 6 पेक्षा कमी इकॉनॉमीने धावा दिल्या आणि 2-2 विकेट घेतल्या. त्याचवेळी हार्दिक पांड्याने 20 धावांत 3 बळी घेतले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news