पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येवर युगांडाचा ऑलआऊट करत वेस्ट इंडिजने 134 धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. क गटातील या सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 173 धावा केल्या. प्रत्युत्तरात युगांडाचा संघ केवळ 39 धावांवर गारद झाला. याचबरोबर टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येच्या विक्रमाची बरोबरी झाली आहे. याआधी 2014 साली नेदरलँडचा संघही 39 धावांत गारद झाला होता.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रँडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स संघासाठी सलामीला आले. या जोडीने सलामीच्या विकेटसाठी 41 धावा जोडल्या. किंग 13 धावा करून बाद झाला तर चार्ल्सने 42 चेंडूत 44 धावा केल्या. ही जोडी फुटल्यानंतर निकोलस पुरान (17 चेंडूत 22 धावा), कर्णधार पॉवेल (18 चेंडूत 23 धावा), रदरफोर्ड (16 चेंडूत 22 धावा) आंद्रे रसेल (17 चेंडूत 30 धावा) यांनी योगदान दिले. परिणामी संघ 20 षटकात 173 धावा करू शकला. युगांडाकडून कर्णधार मसाबाने 2 बळी घेतले. त्याचवेळी रमजानी, क्यावुता आणि नाकराणी यांनाही प्रत्येकी 1 बळी मिळाला.
174 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाची पहिली विकेट पहिल्याच षटकात पडली. रॉजर मुकासा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. अकील हुसेनने त्याची विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सायमन सेसाझीच्या (4) रूपाने संघाला दुसरा धक्का बसला. यानंतर तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अल्पेश रामजानी (5) बाद झाला. तर चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रॉबिन्सन ओबुया (6) माघारी परतला. 5 व्या षटकात अकील हुसेन रियाजत अली शाहचा अडसर दूर केला. अशाप्रकारे युगांडाचा निम्मा संघ तंबूत परतला.
संघाच्या विकेट पडण्याची प्रक्रिया अशीच सुरू राहिली. 7व्या षटकात युगांडाला दोन धक्के बसले. दिनेश नाक्राणी (0), केनेथ वैसावा (1) हे बाद झाले. त्यानंतर संघाला कर्णधार ब्रायन मसाबाच्या (1) रुपात आठवा झटका बसला. संघाला शेवटचे दोन धक्के 11व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कॉस्मास क्यूवुटा (01) आणि 12व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फ्रँक न्सुबुगा (0) यांच्या रूपाने मिळाले. जुमा मियागी 11वा खेळाडू म्हणून नाबाद राहिला, त्याने 20 चेंडूत नाबाद 13 धावा केल्या. मियागी हा दुहेरी आकडा पार करणारा एकमेव फलंदाज ठरला.
वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज अकिल हुसेनने 4 षटकांत केवळ 11 धावा देऊन 5 बळी मिळवले. यादरम्यान त्याची इकॉनॉमी 2.75 राहिली. अकिलशिवाय रोमॅरियो रदरफोर्डने 1, आंद्रे रसेलने 1 बळी, गुडाकेश मोतीने 1 बळी, तर अल्झारी जोसेफने 2 बळी घेतले.
क गटात विंडिजचा हा सलग दुसरा विजय असून युगांडाचा तीन सामन्यातील दुसरा पराभव आहे. सलग दुसऱ्या विजयासह यजमान वेस्ट इंडिजने सुपर-8 मध्ये जाण्याच्या आशा अबाधित ठेवल्या आहेत. त्यांचे आणि अफगाणिस्तानचे समान गुण झाले आहेत. मात्र अफगाण संघ गुणतालिकेत चांगल्या धावगतीच्या आधारावर अव्वल स्थानी आहे.
नेदरलँड्स : 39 धावा (विरुद्ध श्रीलंका, 2014)
युगांडा : 39 धावा (विरुद्ध वेस्ट इंडीज, 2024)
नेदरलँड्स : 44 धावा (विरुद्ध श्रीलंका, 2021)
वेस्ट इंडिज : 55 धावा (विरुद्ध इंग्लंड, 2021)
युगांडा : 58 धावा (विरुद्ध अफगाणिस्तान, 2024)