

T20 World Cup IND vs PAK Toss Must Happen in Colombo
मुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना सर्वाधिक प्रतीक्षा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याची आहे. मात्र, पालिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता हा सामना होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
टी-२० विश्वचषकातील सर्वात मोठा मानल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकतेच पाकिस्तानने १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताविद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. जर पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहिला, तर हा सामना रद्द होईल. अशा स्थितीत प्रश्न असा उपस्थित होतो की, जर सामना होणारच नसेल, तर भारतीय संघाने श्रीलंकेला जावे का? मात्र याचे उत्तर आहे; हो. भारताला या सामन्यातून पूर्ण २ गुण मिळवायचे असतील, तर श्रीलंकेला जाणे अनिवार्य आहे.
नियमांनुसार, जर पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला नाही, तर त्यांना पराभूत घोषित केले जाईल. मात्र, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पूर्ण २ गुण तेव्हाच मिळतील, जेव्हा संघ वेळेत कोलंबोमध्ये पोहोचेल आणि निर्धारित वेळेत मैदानात उपस्थित राहील.
आयसीसीच्या नियमांनुसार, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला टॉसच्या वेळी मैदानात उपस्थित राहावे लागेल. जर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा टॉससाठी उपस्थित राहिला नाही, तर मॅच रेफरी भारतीय संघाला विजयी घोषित करतील आणि भारताच्या खात्यात २ गुण जमा होतील.
जर भारतीय संघाने 'सामना होणार नाही' हे गृहीत धरून श्रीलंकेला जाणे टाळले, तर समीकरण बदलेल. अशा परिस्थितीत मॅच रेफरी दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देतील. म्हणजेच, पूर्ण दोन गुण मिळवण्यासाठी टीम इंडियाला मैदानात पोहोचणे आणि टॉससाठी उपलब्ध राहणे बंधनकारक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याच कारणामुळे भारतीय संघ कोलंबोचा दौरा करेल, सराव सत्रात सहभागी होईल आणि सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवादही साधेल.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची अधिकृत विनंती केली आहे. पाकिस्तानचा हा निर्णय 'खेळ भावने'च्या विरोधात असल्याचे आयसीसीचे मत आहे. अद्याप आयसीसीने कोणत्याही अधिकृत बंदीची किंवा शिक्षेची घोषणा केलेली नाही, परंतु पाकिस्तान क्रिकेटला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असे संकेत दिले आहेत.
भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकणे पाकिस्तानला महागात पडू शकते. यामुळे पाकिस्तानच्या नेट रन रेटवर (NRR) मोठा परिणाम होईल, ज्यामुळे स्पर्धेच्या पुढील फेरीत त्यांचा प्रवास कठीण होऊ शकतो. आता सर्वांचे लक्ष आयसीसी आणि पीसीबीकडे लागले असून, पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहतो की शेवटच्या क्षणी 'यू-टर्न' घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.