T20 World Cup : कॅनडाचेही धक्कातंत्र, आयर्लंडला हरवले

T20 World Cup : कॅनडाचेही धक्कातंत्र, आयर्लंडला हरवले

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत धक्कादायक निकालाचे सत्र सुरूच असून, 'अ' गटातील शुक्रवारी झालेल्या सामन्यात कॅनडाने आयर्लंडवर १२ धावांनी मात केली. कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १३७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आयरिश फलंदाजांनी हाराकिरी केली. ठराविक अंतराने त्यांच्या विकेट पडत गेल्या. त्यामुळे त्यांच्याकडून भागीदारी होऊ शकली नाही. त्यांचा मार्क एडायर याने एकट्याने किल्ला लढवला; पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. एडायर सर्वाधिक ३४ धावा करून बाद झाला आणि आयर्लंडचा पराभव झाला. आयर्लंड संघाने २० षटकांत ७ बाद १२५ धावा केल्या.

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नवनीत धालिवाल (६) हा तिसऱ्याच षटकात मार्क एडायरला विकेट देऊन परतला. दुसऱ्या षटकात धालिवालचा झेल पकडला गेला होता. परंतु, आयर्लंडच्या खेळाडूंनी 'डीआरएस' न घेतल्याने त्याला जीवदान मिळाले. अॅरोन जॉन्सन व परगत सिंग हे सेट होऊन धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नात दिसले. मात्र, जॉन्सन (१४) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर झेलबाद झाला.

परगतही १८ धावा करून क्रेग यंगच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने कॅनडाला ४२ धावांवर तिसरा धक्का बसला. दिलप्रीत बाजवा (७) गॅरेथ डेलानीच्या पहिल्याच चेंडूवर सोपा झेल देऊन माघारी परतला. कॅनडाने १० षटकांत ४ बाद ६३ धावा केल्या. निकोलस किर्टन व श्रेयस मुववा यांनी अर्धशतकी भागीदारी करून कॅनडाची गाडी रुळावर आणली. १९ व्या षटकात ७५ धावांची ही भागीदारी तुटली. किर्टन ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४९ धावांवर झेलबाद झाला. बॅरी मॅकार्थीन या षटकात दोन विकेटस् घेतल्या. मुववाने (३७) शेवटपर्यंत खेळ करून संघाला ७ बाद १३७ धावांपर्यंत पोहोचवले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news