West Indies vs Italy : कॅरेबियन मा-यापुढे इटलीची शरणागती, वेस्ट इंडीजचा विजयी 'चौकार'

T20 World Cup 2026 : इटलीचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात
T20 World Cup 2026 West Indies defeat Italy by 42 runs in Kolkata
Published on
Updated on

T20 World Cup 2026 West Indies defeat Italy by 42 runs in Kolkata

कोलकाता : टी-२० विश्वचषक २०२६ च्या रणधुमाळीत वेस्ट इंडिजच्या 'कॅरेबियन वादळाने' आपली घोडदौड कायम राखत प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी (दि. १९) कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सच्या हिरवळीवर पार पडलेल्या लढतीत वेस्ट इंडिजने नवख्या इटलीचा ४२ धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह विंडीजने साखळी फेरीत सलग चार सामने जिंकून विजयाचा 'चौकार' लगावला आहे. तर क्रिकेट विश्वात पदार्पण करून आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या इटलीच्या संघाचा प्रवास मात्र येथेच संपुष्टात आला आहे.

साखळी फेरीतील 'गट-क' मधील या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत १६५ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले होते. प्रत्युत्तरात इटलीचा डाव १८ व्या षटकात १२३ धावांवरच गारद झाला.

शाय होपची संयमी खेळी

कोलकात्याच्या खेळपट्टीवर इटलीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला तो सार्थही ठरवला. फॉर्मात असलेल्या ब्रँडन किंग आणि शिमरॉन हेटमायर यांना पॉवरप्लेमध्येच स्वस्तात बाद करून इटलीने विंडीजला बॅकफूटवर ढकलले होते. मात्र, अशा पडझडीच्या काळात कर्णधार शाय होपने जबाबदार खेळी केली. त्याने ४६ चेंडूंमध्ये ७५ धावांची तडाखेबंद खेळी साकारून त्याने विंडिजच्या डावाला आकार दिला.

मधल्याफळीत रोवमन पॉवेल आणि शेर्फेन रदरफोर्ड स्वस्तात तंबूत परतले तरी होपने एका बाजूने खिंड लढवली. इटलीच्या क्रिशन कलुगामगे (२/२५) आणि बेन मनेन्टी (२/३७) यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत विंडीजच्या धावगतीला लगाम घातला. अखेरच्या षटकांत विंडीजचा डाव १८० पार जाईल असे वाटत असताना इटलीच्या गोलंदाजांनी पुनरागमन केले आणि त्यांना १६५ धावांत रोखले.

विंडीजच्या वेगवान माऱ्यासमोर इटलीची शरणागती

१६६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इटलीची सुरुवात वादळी झाली. मोस्का बंधूंनी सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेत विंडीजच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. मात्र, ही आक्रमकता फार काळ टिकली नाही. मॅथ्यू फोर्डने आपल्या धारदार गोलंदाजीने इटलीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने १९ धावांत ३ विकेट घेऊन इटलीला सुरुवातीचे धक्के दिले.

त्यानंतर खऱ्या अर्थाने मैदानात शमार जोसेफची 'गती' आणि 'बाऊन्स' पाहायला मिळाला. जोसेफने आपल्या भेदक माऱ्याने इटलीच्या फलंदाजांना खेळणे अशक्य करून टाकले. त्याने ३० धावा देऊन ४ बळी टीपले. त्याच्या या अशा प्रभावी आकडेवारीसह इटलीचा डाव १८ व्या षटकातच गुंडाळला. इटलीचा अनुभव या मोठ्या मंचावर कमी पडला आणि त्यांचा संघर्ष १२३ धावांवर संपुष्टात आला.

थोडक्यात धावफलक :

वेस्ट इंडिज : १६५/६ (२० षटके) - शाही होप ७५, मॅथ्यू फोर्ड (नाबाद उपयुक्त धावा); कलुगामगे २/२५.

इटली : १२३ (सर्वबाद, १८ षटके) - शमार जोसेफ ४/३०, मॅथ्यू फोर्ड ३/१९.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news