

अहमदाबाद : ज्या मैदानावर काही काळापूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा पडली होती, त्याच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज टीम इंडियाने सोनेरी इतिहास रचला आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम युद्धात न्यूझीलंडचा पराभव करत भारताने तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील पहिलाच संघ ठरला असून, या विजयाने भारतीय क्रिकेटचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
या हाय-व्होल्टेज लढतीत यजमान भारताने प्रथम फलंदाजी करताना २५५/५ असा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात किवी संघाचा डाव १९ व्या षटकात अवघ्या १५९ धावांत आटोपला. यासह सलग दोनदा विश्वविजेतेपद पटकावणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.
न्यूझीलंडच्या डावातील १९ व्या षटकात अभिषेक शर्माने टाकलेल्या सहाव्या चेंडूवर भारताच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. जॅकब डफीने मारलेला हवेतील फटका लाँग-ऑन सीमारेषेवर उभ्या असलेल्या टिळक वर्माने अत्यंत चपळाईने टिपला. सीमारेषेच्या अगदी जवळ असल्याने स्वतःचा तोल सावरण्यासाठी टिळकने चेंडू हवेत उडवला आणि मैदानाच्या आत पुन्हा तो सुरक्षित झेलला. डफी बाद होताच अहमदाबादचे मैदान 'इंडिया-इंडिया'च्या जयघोषाने दुमदुमले आणि भारतीय खेळाडूंनी मैदानावरच जल्लोष सुरू केला.
या विजयाने केवळ चषक मिळाला नाही, तर इतिहासाच्या पानावर तीन अशा नोंदी झाल्या ज्या आजवर कोणालाही शक्य झाल्या नव्हत्या.
तिहेरी मुकुट : क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही देशाला ३ वेळा टी-२० विश्वचषक जिंकता आलेला नव्हता. ही ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिलाच संघ ठरला आहे.
विजयाचे सातत्य : सलग दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरून भारताने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
यजमान विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात : 'यजमान देशाला मायदेशात विश्वचषक जिंकता येत नाही' हा प्रदीर्घ काळ चालत आलेला समज भारताने आज मोडीत काढला. मायदेशातील चाहत्यांच्या साक्षीने हा पराक्रम करून टीम इंडियाने ऐतिहासिक पराक्रमाची नोंद केली आहे.
जुन्या जखमांवर फुंकर: याच मैदानावर झालेल्या जुन्या पराभवाचे दुःख विसरून भारताने आज त्याच ठिकाणी विजयाचा गुलाल उधळला आहे.
भारतीय डावाची सुरुवात संजू सॅमसन (८९) आणि अभिषेक शर्मा (५२) यांनी वादळी पद्धतीने केली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ईशान किशननेही (५४) अर्धशतकी योगदान दिले. डावाच्या अखेरीस शिवम दुबेने केवळ ८ चेंडूत नाबाद २६ धावा कुटत भारताला विशाल धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
विजयाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची दाणादाण उडाली. फिन ॲलन (९), रचिन रवींद्र (१), ग्लेन फिलिप्स (५) आणि मार्क चॅपमन (३) यांसारख्या दिग्गज फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. टिम साउफर्टने (५२) झुंजार अर्धशतक झळकावले, मात्र ते पराभव टाळण्यासाठी पुरेसे ठरले नाही.
संजू सॅमसनने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सहावे अर्धशतक अवघ्या ३३ चेंडूत पूर्ण केले. त्याने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ८९ धावांची खेळी केली. यासह सॅमसन आता टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध ८५* धावा करणाऱ्या मार्लन सॅम्युअल्सचा विक्रम मोडीत काढला.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सलग ३ सामन्यांत ५०+ धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला. (सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध ८९ आणि सुपर-८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ९७*).
विराट कोहलीनंतर विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम अशा दोन्ही सामन्यांत अर्धशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
कोहलीचा विक्रम मोडला: एकाच विश्वचषक आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा (२०१४ मध्ये ३१९ धावा) विक्रम सॅमसनने मागे टाकला आहे. या यादीत ईशान किशन (३१७ धावा) तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीला चाचपडणाऱ्या अभिषेक शर्माने निर्णायक वेळी आपली लय शोधली. त्याने अंतिम सामन्यात २१ चेंडूत ५२ धावांची वेगवान खेळी केली. दुसरीकडे, ईशान किशनने ५४ धावा करताना सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. या स्पर्धेत ईशानने १९३.२९ च्या सरासरीने ३१७ धावा केल्या असून त्यात १८ षटकारांचा समावेश आहे.
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात अवघ्या १५ धावा देत ४ बळी टिपले. टी-२० विश्वचषकाच्या फायनलमधील ही दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे. त्याने या संपूर्ण स्पर्धेत ८ सामन्यांत १४ बळी मिळवून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
फलंदाजीचे त्रिकूट: टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका संघाच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली.
विशाल धावसंख्या: भारताने टी-२० विश्वचषक इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या (२५५/५) नोंदवली. तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५०+ धावसंख्या उभारण्याची ही भारताची सातवी वेळ आहे.
भारताने २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसरे जेतेपद मिळवले. आता २०२६ चे जेतेपद पटकावून भारताने केवळ आपल्या जेतेपदाचा यशस्वी बचावच केला नाही, तर यजमान म्हणून विश्वचषक जिंकणारा पहिला देश होण्याचा मानही मिळवला आहे.