

अहमदाबाद : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर-8 फेरी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून आज येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गट-1 मधील दोन बलाढ्य संघ, वेस्ट इंडिज - दक्षिण आफ्रिका हे एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघांनी आपापल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला असून, आजचा विजय त्यांना उपांत्य फेरीसमीप नेणारा ठरेल. यामुळे ही लढत विशेष महत्त्वाची असणार आहे. दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
वेस्ट इंडिजचा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असून त्यांनी झिम्बाब्वेचा 107 धावांनी धुव्वा उडवला आहे. या सामन्यात विंडीजने 20 षटकांत 254 धावांचा डोंगर उभा केला होता. शिमरॉन हेटमायर (34 चेंडूंत 85 धावा) आणि रोव्हमन पॉवेल (35 चेंडूंत 59 धावा) यांनी चौकार-षटकारांची जोरदार आतषबाजी केली. हेटमायर (219 धावा) आणि मोटी (10 बळी) हे सध्या विंडीजचे हुकमी एक्के ठरत आहेत.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या सामन्यात बलाढ्य भारताला 76 धावांनी नमवून सर्वांना थक्क केले आहे. डेवाल्ड ब्रेविस आणि डेव्हिड मिलर यांच्या फटकेबाजीमुळे आफ्रिकेने 187 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर मार्को यानसेन (4 बळी) आणि केशव महाराज (3 बळी) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. कर्णधार एडन मार्कराम आणि तुफानी फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज मार्को यानसेन यांच्यावर आफ्रिकेची भिस्त असेल.
वेस्ट इंडिज : शाय होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, जेसन होल्डर, अकिल हुसेन, बेडॉन किंग, गुडाकेश मोटी, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, मार्को यानसेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्ज, एन्रिक नॉर्त्झे, रियान रिकेल्टन.
आकडेवारीवर नजर टाकल्यास दोन्ही संघ तोडीस तोड दिसत आहेत. उभय संघांमध्ये आतापर्यंत एकूण 29 टी-20 सामने झाले असून, 15 सामन्यांत वेस्ट इंडिजने तर 14 सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. अहमदाबादच्या खेळपट्टीवर विंडीजची फटकेबाजी चालणार की आफ्रिकेचा शिस्तबद्ध मारा प्रभावी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.