

कोलंबो : टी-20 विश्वचषकातील सुपर-8 फेरीला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. पहिल्या लढतीत न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे दोन जुने प्रतिस्पर्धी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर एकमेकांशी भिडणार आहेत. या दोन्ही संघांनी ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2025 या 30 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 41 वेळा एकमेकांचा सामना केला आहे, त्यामुळे दोन्ही संघ एकमेकांच्या रणनीतीशी पूर्णपणे परिचित आहेत.
या स्पर्धेत न्यूझीलंडने आपले साखळी सामने चेन्नई आणि अहमदाबादच्या वेगवान गोलंदाजीला पूरक खेळपट्ट्यांवर खेळले आहेत. मात्र, कोलंबोची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी आहे. त्यामुळे मिचेल सँटेनरच्या साथीला ईश सोधीची संघात एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने श्रीलंकेतील परिस्थितीचा चांगला अनुभव घेतला आहे. कर्णधार सलमान अली आगाने या सामन्यात फिरकी गोलंदाजांवर अधिक अवलंबून राहण्याचे संकेत दिले आहेत. भारताकडून झालेल्या पराभवानंतर अबरार अहमदचे संघात पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे.
न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यांनी 4 सामन्यांत केवळ 14 गडी गमावले आहेत. दुसरीकडे, पाकची मदार साहिबजादा फरहान आणि बाबर आझम यांच्यावर असेल.
जरी न्यूझीलंडने शेवटच्या 16 पैकी 12 टी-20 सामन्यांत पाकिस्तानला हरवले असले, तरी विश्वचषकाचा विचार करता पाकिस्तानचे पारडे जड आहे. टी-20 विश्वचषकात या दोन्ही संघांमध्ये झालेल्या 7 सामन्यांपैकी 5 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.