IND vs ZIM : भारताने मैदान मारले, झिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय; ब्रायन बेनेटची ९७ धावांची चिवट झुंज

T20 World Cup 2026 : भारताचा सुपर-८ मधील पहिला विजय
IND vs ZIM : भारताने मैदान मारले, झिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय; ब्रायन बेनेटची ९७ धावांची चिवट झुंज
Published on
Updated on

चेन्नई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीतील आपल्या दुस-या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय मिळवत सेमीफायनलच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ बाद २५६ धावांचा डोंगर उभा केला होता, प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने चिवट झुंज दिली आणि २० षटकांत ६ बाद १८४ धावांपर्यंतच मजल मारली.

भारतीय फलंदाजांचे 'पावर-पॅक' प्रदर्शन

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरुवात वादळी झाली. संजू सॅमसन (२४) आणि अभिषेक शर्मा (५५) यांनी पॉवरप्लेमध्येच ८० धावा कुटल्या. अभिषेक शर्माने अवघ्या ३० चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५५ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यानंतर इशान किशन (३८) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (३३) यांनी धावगती कायम ठेवली.

हार्दिक-तिलकची अभेद्य भागीदारी

डावाच्या उत्तरार्धात हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची पिसं काढली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी केवळ ३१ चेंडूत ८४ धावांची नाबाद भागीदारी केली.

  • हार्दिक पंड्या : ५०* धावा (२३ चेंडू, २ चौकार, ४ षटकार)

  • तिलक वर्मा: ४४* धावा (१६ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार - स्ट्राइक रेट २७५.००)

झिम्बाब्वेची झुंज, पण भारतीय गोलंदाजी सरस

२५७ धावांच्या अशक्य वाटणाऱ्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात संथ झाली. ब्रायन बेनेटने एकाकी झुंज देत ५९ चेंडूत नाबाद ९७ धावांची (८ चौकार, ६ षटकार) शानदार खेळी केली, मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. कर्णधार सिकांदर रझाने ३१ धावांचे योगदान दिले.

अर्शदीपचा 'तिहेरी' तडाखा

भारताकडून अर्शदीप सिंगने ४ षटकांत २४ धावा देत ३ बळी टिपले आणि झिम्बाब्वेच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याने शिस्तबद्ध गोलंदाजी करत झिम्बाब्वेला विजयापासून दूर ठेवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news