

T20 WC 2026 Mega Plan: टी–20 वर्ल्ड कप 2026 चे वेळापत्रक जाहीर झाले असून यंदाचा विश्वचषक अनेक कारणांनी खास ठरणार आहे. भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान तब्बल 30 दिवसांचा हा क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. दोन देशांतील सात शहरांमध्ये आणि आठ मैदानांवर सामने खेळले जाणार असून, टी–20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच काही मोठे बदल होणार आहेत.
या वेळी पहिल्यांदाच 20 संघ विश्वचषकात उतरतील. यामध्ये पहिल्यांदाच इटलीचा समावेश झाला आहे. सर्व संघांना पाच-पाच संघांच्या चार गटांत विभागले गेले आहे. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ पुढे जात "सुपर-8"मध्ये पोहोचतील. त्यानंतर दोन गटांमधून चार सर्वोत्तम संघ सेमीफायनलला पोहोचतील. सेमीफायनल कोलकाता/कोलंबो आणि मुंबई या ठिकाणी खेळली जाईल. अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबो येथे होईल.
सर्व क्रिकेटप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहतात असा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. हा सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. एशिया कपनंतर दोन्ही संघांमध्ये झालेल्या तिन्ही सामन्यांना मोठी प्रेक्षकसंख्या मिळाल्याने, ICC नेही हा सामना रविवारीच ठेवला आहे.
भारत 7 फेब्रुवारीला मुंबईत अमेरिकेविरुद्ध खेळेल. 12 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये नामिबियाशी सामना होईल. त्यानंतर कोलंबोमध्ये भारत–पाक सामना होईल. 18 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये नेदरलँडविरुद्ध भारताचा शेवटचा सामना असेल.
गट A : भारत, पाकिस्तान, नामिबिया, अमेरिका, नेदरलँड
गट B : ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान
गट C : इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, नेपाळ, इटली
गट D : न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएई
टी–20 वर्ल्ड कपची सुरुवात 2007 मध्ये झाली. पहिला विश्वविजेता भारत ठरला. 2024 मध्ये रोहित शर्माने पुन्हा भारताला विजेतेपद मिळवून दिलं आणि आता 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
भारत, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या तिन्ही संघांनी दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावलं आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या खात्यात प्रत्येकी एक विजेतेपद आहे.