T20WC : अफगाणिस्तानच्या विजयानंतर सेमीफायनलचे समीकरण बदलले, भारताला धोका

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी शानदार विजय मिळवला
T20 World Cup Semi Final Scenario
सुपर 8 च्या अ गटातील उपांत्य फेरीची लढत खूपच रोमांचक झाली आहे. File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : टी-20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी शानदार विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अफगाण संघाने चालू टी-20 विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली. या संघाने ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंडसारख्या संघाला पराभूत करून सुपर-8 मध्ये स्थान पक्के केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर अफगाणिस्तानचे सुपर 8 फेरीतील गट 2 मध्ये दोन गुण जमा झाले आहेत. या ऐतिहासिक विजयाच्या जोरावर त्यांचे मनोबल उंचावले आहे. संघाचे गोलंदाज आणि फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

सेमीफायनच्या शर्यतीत चुरस

  • अफगाणिस्तानने टी-20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीत सर्वात मोठा उलटफेर केला.

  • राशिद खानच्या संघाने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

  • या विजयानंतर सेमीफायनच्या शर्यतीत चुरस आला आहे.

  • भारताला यामुळे धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मोठा उलटफेर

अफगाणिस्तानने टी-20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीत सर्वात मोठा उलटफेर केला. राशिद खानच्या संघाने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 21 धावांनी शानदार विजय मिळवला. अफगाणी खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले. ज्यामुळे त्यांना कांगारूंना पराभवाची धूळ चारण्यात यश आले. (T20 World Cup)

उपांत्य फेरीची लढत मनोरंजक

या निकालानंतर सुपर 8 च्या अ गटातील उपांत्य फेरीची लढत खूपच रोमांचक झाली आहे. भारतीय संघ दोन्ही सामने जिंकून अ गटात अव्वल स्थानावर आहे. ज्यामुळे टीम इंडियाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने उपांत्य फेरी गाठण्याची लढत मनोरंजक बनवली आहे.

बांगलादेशही शर्यतीत, पण..

एकीकडे भारतीय संघ दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरी गाठण्याच्या मार्गावर होता, मात्र अफगाणिस्तानच्या विजयाने भारताच्या समीकरणालाही कलाटणी दिली आहे. याशिवाय अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाही शर्यतीत कायम आहेत. गणितानुसार बांगलादेशही शर्यतीत आहे पण त्यांची शक्यता कमी झाली आहे.

सेमीफायनलसाठी चुरस

एकीकडे भारतीय संघ आपले दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीच्या जवळ पोहचला आहे, तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या विजयाने ऑस्ट्रेलियाचे समीकरण बिघडले आहे. आता अ गटात अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी एक-एक विजयासह बरोबरीत आहेत. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना भारताशी तर अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशशी खेळणार आहे.

ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरीचे समीकरण रंजक

आता जर ऑस्ट्रेलिया भारताकडून हरला आणि अफगाणिस्तान संघ बांगलादेशविरुद्ध जिंकला तर अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. त्याचवेळी जर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून हरला आणि बांगलादेशने अफगाणिस्तानला पराभूत केले तर ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.

भारतासाठीही धोका?

ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे भारताचेही नुकसान होऊ शकते. वास्तविक, भारतीय संघ पुढील सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हरला तर दोन्ही संघांचे गुण 4-4 होतील. दुसरीकडे, अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धचा त्यांचा शेवटचा जिंकल्यास तिन्ही संघांचे गुण 4-4 होतील. अशा परिस्थितीत ज्या संघाचा रनरेट चांगला असेल तो उपांत्य फेरीत पोहोचेल. सध्या टीम इंडियाचा नेट रनरेट +2425 आहे. इतर संघांपेक्षा तो खूपच चांगला आहे. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, अशा परिस्थितीत येथे काहीही होऊ शकते, जर ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध मोठा विजय मिळवण्यात यशस्वी झाला तर टीम इंडियासाठी समीकरण बिघडू शकते.

सुपर 8 गटात अव्वल स्थानी राहणे महत्त्वाचे

वास्तविक, यावेळी टी-20 वर्ल्डकपमध्ये फक्त पहिली सेमीफायनल खेळणाऱ्या संघासाठी राखीव दिवस देण्यात आला आहे. भारतीय संघ आपल्या गटात पहिल्या क्रमांकावर राहिला नाही तर भारतीय संघाला दुसरी सेमीफायनल खेळावी लागेल. दुसऱ्या सेमीफायनलसाठी कोणताही राखीव दिवस नाही. त्यामुळे जर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला तर सुपर 8 मधील गटात अव्वल असणारा संघ फायनल खेळेल. त्यामुळे भारताला आपल्या गटात पहिल्या क्रमांकावर राहणे गरजेचे आहे.

भारताचे उपांत्य फेरीत जाणे निश्चित आहे का?

भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणे फार कठीण आहे. भारताला बाहेर काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रोहित सेनेचा 41 किंवा त्याहून अधिक धावांनी पराभव करावा लागेल. तर दुसरीकडे अफगाणिस्तानला बांगलादेशवर 83 किंवा त्याहून अधिक धावांनी विजय मिळवावा लागणार आहे.

भारत आणि बांगलादेशच्या संघांनी आपापले शेवटचे साखळी सामने जिंकल्यास भारतीय संघ 6 गुणांसह पहिल्या क्रमांकावर राहील. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे प्रत्येकी 2 गुण होतील. या स्थितीत निव्वळ धावगतीच्या आधारावर दुसरा उपांत्य फेरीचा खेळाडू निश्चित होईल. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य मानली जात नसली तरी या दोन शक्यता एकाच वेळी पूर्ण होणे खूप कठीण आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news