न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयाची केवळ 2 टक्के शक्यता असल्याचे मोठ्या पडद्यावर दिसत होते. अशावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या सहकार्यांना दिलेल्या कानमंत्राने खेळाडू प्रेरित झाले. रोहितने त्यांना 'नेव्हर गिव्ह अप'चा सल्ला दिला आणि भारताने विजय खेचून आणला. रोहित शर्माच्या संघाने जोरदार पुनरागमन करत पाकिस्तानकडून विजय हिसकावून घेतला. या निर्णायक क्षणी कर्णधार रोहित शर्माने संघाचे मनोबल कायम राखले आणि खेळात टिकून राहण्यासाठी प्रेरित केले. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्माने मैदानात घडलेला प्रसंग सांगितला.
रोहित म्हणाला, गेल्या सामन्याच्या तुलनेत ही खेळपट्टी चांगली होती. अशा बॉलिंग लाईन-अप सोबत खेळताना तुमचाही आत्मविश्वास वाढतो. पाकिस्तानचा डाव सुरू असताना ड्रिंक्स ब्रेकला आम्ही सगळे एकत्र जमा झालो. त्यावेळी मी सहकार्यांना सांगितले की, जर आपला संघ 3 बाद 80 वरून 119 धावांवर ऑल आऊट होऊ शकतो, तर त्यांच्या बाबतीतही हे घडू शकते. तेही विकेटस् गमावू शकतात. प्रत्येकाचे थोडेसे जास्तीचे योगदान खूप मोठा बदल घडवू शकतो. फक्त तुम्ही गिव्ह अप करू नका. यानंतर आमच्या खेळात आमूलाग्र बदल झाला. संघ एका नव्या इर्ष्येने खेळू लागला, असे रोहित शर्माने सांगितले. भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य अजिबात डगमगलेले दिसले नाही. आपले मनोबल कायम राखत आपल्या कामगिरीवर लक्ष्य साधत संघाने हा अनपेक्षित विजय मिळवला. रोहित शर्मा आणि संघाच्या या रणनीतीसह भारतीय संघाने 15 व्या षटकापासून पाकिस्तानवर असा काही दबाव बनवला की संघाला एकही बाऊंड्री लगावण्याची संधी दिली नाही.
कर्णधार रोहित शर्माने न्यूयॉर्कमध्ये सामन्यासाठी उपस्थित असलेल्या भारतीय चाहत्यांचे आभार मानले. ही फक्त सुरुवात असल्याचे आश्वासनही त्याने सर्वांना दिले आहे. कर्णधार म्हणाला, गर्दी विलक्षण होती. आम्ही कुठेही कसेही खेळत असो ते कधीही निराश करत नाहीत. मला खात्री आहे की ते हसतमुखाने घरी जातील. ही फक्त सुरुवात आहे, आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
बुमराहने मोहम्मद रिझवानला क्लीन बोल्ड करत पाकिस्तानच्या आशा संपुष्टात आणल्या. यानंतर भारताच्या प्रत्येक गोलंदाजाने उत्कृष्ट गोलंदाजी करत बुमराहला साथ दिली. बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे त्याला सामनावीरचा पुरस्कारही मिळाला. बुमराहच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित म्हणाला, बुमराह काय करू शकतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. संपूर्ण विश्वचषकात तो याच मानसिकतेने खेळावा, अशी माझी इच्छा आहे. तो एक प्रतिभावान खेळाडू आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे.