

Vaibhav Suryavanshi century in the SMAT
कोलकाता : भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने आज (दि. २ डिसेंबर) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) T20 मध्ये शतक झळकावत इतिहास रचला आहे. ईडन गार्डन्सवर महाराष्ट्र संघाविरुद्ध १४ वर्षीय वैभवने शतकी खेळी केली. अशी कामगिरी करणारा तो देशातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या बिहारने २० षटकांत ३ बाद १७६ धावा केल्या. वैभवने केवळ ६१ चेंडूत नाबाद १०८ धावा केल्या. त्याच्या या झंझावती खेळीत ७ चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. त्याने २० व्या षटकात आपले शतक पूर्ण केले.
वैभवला सुरुवातीच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये (Domestic Cricket Career) धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. मागील तीन सामन्यात अनुक्रमे १४, १३ आणि ५ धावा काढल्या होत्या. त्याच्याकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्याने आज कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर शतकी खेळी करत ही अपेक्षा पूर्ण केली. यापूर्वी त्याने दोहा येथे झालेल्या 'रायझिंग स्टार्स आशिया कप' स्पर्धेत युएईविरुद्ध ४२ चेंडूंमध्ये १४४ धावांची तुफानी खेळी केली होती. आज सुरुवातीला त्याने अत्यंत संयमाने फलंदाजी केली. खेळ बहरल्यावर त्याने मुक्तहस्ते फटकेबाजीही केली. वैभवने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केवळ १४ वर्षे आणि २५० दिवसांचा असताना शतक झळकावत इतिहास रचला. तसेच पहिला चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत तो मैदानावर नाबाद टिकून राहिला.