

Suresh Raina
दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला. बेकायदेशीर बेटिंग ॲप्सशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याची चौकशी करण्यात येत आहे. या बातमीमुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे, कारण अनेक क्रिकेटपटू अशा प्रकारच्या ॲप्सच्या जाहिराती करताना दिसतात.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रैनाने काही बेटिंग ॲप्ससाठी जाहिरात केली होती. याच जाहिरातींच्या माध्यमातून त्याचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय एजन्सीला आहे. विशेषतः '1xBet' नावाच्या ॲपशी रैनाचे नेमके काय संबंध आहेत, हे तपासण्याचा ईडीचा प्रयत्न आहे.
भारतात यापूर्वी अनेक बेकायदेशीर बेटिंग ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ही ॲप्स सातत्याने नवनवीन नावाने पुन्हा सुरू होतात आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सेलिब्रिटी व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा वापर करतात. या ॲप्समुळे कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि करचुकवेगिरी होत असल्याचा ईडीला संशय आहे.
मे महिन्यात तेलंगणा पोलिसांनी राणा दग्गुबाती, प्रकाश राज यांच्यासह 25 मोठ्या सेलिब्रिटींविरोधात बेटिंग अॅप्स प्रमोट केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही अभिनेत्यांनी आपला जबाब नोंदवून कोणतेही गैरकृत्य केल्याचे नाकारले असून, ते आता अशा प्लॅटफॉर्म्सचे प्रमोशन करत नसल्याचे स्पष्ट केले.