

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India : भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली. संघात आलेली सुपरस्टार संस्कृती हानिकारक असून पूर्वपुण्याईऐवजी सध्याच्या फॉर्मवर आधारित संघनिवड होणे आवश्यक आहे, असे प्रातिनिधिक मत संजय मांजरेकर, हरभजन सिंग, इरफान पठाण आदींनी मांडले आहे.
सुपरस्टार संस्कृती भारतीय क्रिकेटसाठी हानिकारक ठरत आहे. यावर वेळीच मार्ग काढणे आवश्यक आहे, असे परखड मत भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने मांडले. तसेच बड्यांना वेगळी वागणूक देणे थांबवून संघहिताचे निर्णय घेतले तरच भारतीय क्रिकेट गतवैभव मिळवू शकेल, असे माजी अष्टपैलू इरफान पठाण म्हणाला.
भारतीय क्रिकेटला पुन्हा प्रगतिपथावर आणण्यासाठी सर्वप्रथम ‘सुपरस्टार’ संस्कृती थांबली पाहिजे. संघहिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कामगिरीत कशी सुधारणा करता येईल, याचाच विचार केला पाहिजे. या मालिकेपूर्वीही भारतीय संघातील बड्या खेळाडूंनी देशांतर्गत सामन्यांकडे दुर्लक्ष केले. यात बदल होणे आवश्यक आहे, असे इरफान पठाण याप्रसंगी म्हणाला.