IPL 2024 : हैदराबादचा दणक्यात विजय; शेवटच्या सामन्यात पंजाब पराभूत

IPL 2024 : हैदराबादचा दणक्यात विजय; शेवटच्या सामन्यात पंजाब पराभूत
Published on
Updated on

हैदराबाद; वृत्तसंस्था : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्जवर दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी 215 धावांचा पाठलाग करताना हैदराबादला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला; परंतु अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश कुमार रेड्डी व हेन्रीच क्लासेन यांनी दमदार फटकेबाजी केली. पंजाबच्या गोलंदाजांना सैरभैर करून त्यांनी संघासाठी विजय खेचून आणला. हैदराबाद यााआधीच प्ले ऑफमध्ये पोहोचले आहे. पंजाबने 14 सामन्यांत 5 विजय मिळवले, तर 9 सामन्यांत ते पराभूत झाले. 10 गुणांसह त्यांनी स्पर्धेचा निरोप घेतला.

पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवून मोठी विकेट मिळवली. पण, अभिषेक शर्मा व राहुल त्रिपाठी ही जोडी पंजाबला डोईजड झाली. दोघांनी पहिल्या पाच षटकांत 72 धावा चोपल्या. त्रिपाठी 18 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 33 धावांवर बाद झाला आणि हर्षल पटेलने ही विकेट मिळवली. अभिषेक व नितीश कुमार रेड्डी यांनी 31 चेंडूंत 57 धावांची भागीदारी करून संघाला 10 षटकांत 129 धावांपर्यंत पोहोचवले. अभिषेक 28 चेंडूंत 5 चौकार व 6 षटकारांसह 66 धावांवर झेलबाद झाला. पण, हेन्रीच क्लासेनने मोर्चा सांभाळला आणि संघाला 13 षटकांत 167 पर्यंत पोहोचवले.
हैदराबादने सामना एकतर्फी केला होता. क्लासेन व रेड्डी यांनी 23 चेंडूंत 47 धावा जोडल्या. रेड्डी 25 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 37 धावांवर माघारी परतला. हैदराबादला विजयासाठी 7 धावा हव्या असताना क्लासेन बाद झाला. त्याने 26 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 42 धावा केल्या. हैदराबादने 19.1 षटकांत 6 बाद 215 धावा करून बाजी मारली.

तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा कर्णधार जितेश शर्मा याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबचे बरेचसे परदेशी खेळाडू मायदेशात परतले असल्याने रायली रूसो या एकमेव परदेशी खेळाडूंसह ते मैदानावर उतरले. आयपीएल इतिहासात प्रथमच प्लेईंग इलेव्हनमध्ये एकच परदेशी खेळाडू खेळला. अथर्व तायडे व प्रभसिमरन सिंग यांनी पंजाबला दमदार सुरुवात करून देताना 9 षटकांत 97 धावा फलकावर चढवून दिल्या. 10 व्या षटकात टी नटराजनने ही भागीदारी तोडली आणि अथर्व 27 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 46 धावांवर झेलबाद झाला. प्रभसिमरनने 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. प्रभसिमरन आणि रायली रूसो यांनी दुसर्‍या विकेटसाठी 32 चेंडूंत 54 धावांची भागीदारी केली.

प्रभसिमरन 45 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारांसह 71 धावांवर झेलबाद झाला. विजयकांत वियास्कांत याने आयपीएलमधील त्याची पहिली विकेट घेतली. पंजाबकडून यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणारा शशांक सिंग (2) रन आऊट झाला. रुसो 24 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांसह 49 धावांवर झेलबाद झाला. हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करताना पंजाबच्या धावसंख्येवर चाप लावला. पण, कर्णधार जितेश शर्माने 15 चेडूंत नाबाद 32 धावा करून पंजाबला 5 बाद 214 धावांपर्यंत पोहोचवले.

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्ज : 20 षटकांत 5 बाद 214. (अथर्व तायडे 46, प्रभासिमरन सिंग 71, रिले रासौ 49. टी नटराजन 2/33.)
सनरायझर्स हैदराबाद : 19.1 षटकांत 6 बाद 215. (अभिषेक शर्मा 66, नितेशकुमार रेड्डी 37, हेन्रिच क्लासेन 42. अर्शदीप सिंग 2/37, हर्षल पटेल 2/49.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news